Breaking News

भिडेंच्या सभेला परवानगी देऊ नये : मागणी


राहुरी विशेष प्रतिनिधी : अहमदनगरमध्ये उद्या {दि. १०} होत असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये. जर ती दिली असेल तर रद्द करावी, या मागणीचे निवेदन राहुरी तालुक्यातील परिवर्तनवादी पुरोगामी चळवळींसह संघटनांच्यावतीने नायब तहसीलदार डमाळे यांना देण्यात आले.

कोरेगाव -भीमा येथे दि. १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील संबंध बहुजन समाज व परिवर्तनवादी चळवळीतील अनुयायी आणि नागरिकांवर नियोजनबद्ध केलेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते. दोन तरुण मरण पावले आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचे मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध दोन महिलांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यातील मिलिंद एकबोटे यांना प्रशासनास अटक करावी लागली. परंतु मनोहर भिडे यांना अद्याप अटक केली गेली नाही. तसेच ते महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन वातावरण भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संविधानाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करत आहे. कायदा-सुव्यस्था अजून बिघडली जाऊन राज्यात दंगल घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मनोहर भिडे यांची जाहीर सभा नगर शहरात रविवारी { दि. १०} टिळकरोड परिसरातील पटेल मंगल कार्यालय येथे होत आहे. शहरातील व देशातील कायदा सुव्यवस्था यापूर्वीच अतिशय नाजूक बनली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपीची सभा अहमदनगरमध्ये होणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे होईल. असे झाल्यास यास सर्वस्वी जिल्हाप्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदनावर बहुजन क्रांती मोर्चाचे संतोष वाघमारे, अ. भा. छावाचे देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. जालिंदर घिगे, सावता माळी युवक संघाचे रोहित टेंभे, अशोक तुपे, संभाजी ब्रिगेडचे विकास बोरुडे, सुनिल तनपुरे, वडार संघटनेचे दिनेश कुसमुडे, भारिपचे बाबा साठे, बी. एस. पी. चे प्रविण लोखंडे, श्रमिक मुक्ती दलाचे संदिप कोकाटे, जमियत उलमा ए-हिंदचे बिलाल शेख, भा. मु. मोर्चाचे स्वप्निल खरात, शिवसेना उपप्रमुख दिपक पंडित, रवी ढोकणे, रवी पटारे, लहुजी शक्ती सेनेचे सुनिल सकट, गोरक्षनाथ ढोकणे, रिपाईचे दत्ता जोगदंड, अनिल विधाते, रासपचे सतिश फुलसौदर, क्रांतीवीर लहुजी टायगर सेनेचे कांतीलाल जगधने, डाॅ. विजय मकासरे आदींच्या सह्या आहेत.