Breaking News

एसटी बंदमुळे राहुरी बसस्थानकात शुकशुकाट!


राहुरी विशेष प्रतिनिधी : राज्यात परिवहन महामंडळच्या कर्मचारयांनी वेतनवाढीच्या कारणावरुन पुकारलेल्या एस. टी. बंदचा परिणाम शिर्डी आणि शनिशिंगणापूर या दोन जगप्रसिद्ध देवस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असलेल्या राहुरी बसस्थानकावर झाला. बंदमुळे या बसस्थानक परिसरात शुकशुकाट दिसून आला. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे. दिव्यांग बांधवांनादेखील प्रवास करतांना नरकयातना सहन कराव्या लागल्या. यावर राज्य सरकारने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी बंद पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच पगारात वाढ केली आहे. मात्र केलेली पगारवाढ मान्य नसल्याचे सांगत कर्मचारयांनी शुक्रवारपासून पुन्हा अंदोलनाचे हत्यार उपसले. कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बंद पुकारल्यामुळे शिर्डी आणि शनिशिंगणापूर या दोन्ही देवस्थानसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आणि १०० पेक्षा अधिक ग्रामीण भाग जोडले गेलेल्या राहुरी बसस्थानकात प्रवाशांसह शनि आणि साईभक्तांचे मोठे हाल होत आहेत. वयोवृध्द महिला, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांनाही या आंदोलनामुळे हाल सहन करावे लागले. शनिवारी {दि. ९ } शाळेच्या सुट्टया संपत आल्याने अनेक गावी गेलेले शालेय विद्यार्थी आणि पालक परतीच्या प्रवासाकडे निघाले असल्याचे राहुरी बसस्थानकात दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. बंदमुळे कालपासून ग्रामीण भागात लालपरी चमकलीच नाही.

दिव्यांग आणि नातेवाईकांना मनस्ताप 

कोपरगाव येथून सोनईकडे {ता. नेवासा } जाण्यासाठी वेदांत राठी या दिव्यांग तरुणाला त्याच्या पालकांना चक्क उचलून घ्यावे लागले. त्याला कवळी घालत खासगी गाडीची त्याच्या पालकांना शोधाशोध करावी लागली. त्या दिव्यांगाला पालकाने उचलून बसेसचा शोध घ्यावा लागला. या बंदमुळे दिव्यांग आणि त्यांच्या पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.