Breaking News

माधवराव आढाव यांची जयंती उत्साहात


कोपरगाव ता. प्रतिनिधी

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. माधवराव आढाव यांनी समाजासाठी आयुष्य वेचले . त्यांचे आचार विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या समाजकार्याने अनेक कुटुंबाला मदतीचा हात मिळाला. समाजावर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते प्रेम करीत होते. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आशुतोष काळे यांनी केले. 

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष माधवराव (अप्पा) कचेश्वर आढाव यांची १०० वी जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी १०.०० वाजता काळे यांच्या हस्ते माधवराव आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, राजेंद्र जाधव, काका कोयटे, डॉ. अजय गर्जे, अशोक खांबेकर आदींनी कै. आढाव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.