सत्ताधार्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवकांचा मोर्चा ः कोते
अहमदनगर/प्रतिनिधी।
भाजपाची सत्ता आल्यापासुन घोषणांचा पाऊस सुरु आहे. चार वर्षात जनतेचा भ्रमनिरास झाला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या. विद्यापीठामध्ये आर.एस.एस. चे विचार लादण्याचा कुटील डाव सुरु आहे. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सुटले नाहीत, तसेच शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, नोटाबंदी नंतर देशात बेरोजगाराची संख्या वाढलेली आदी विषय पाहता राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने विधानसभेवर भव्य मोर्चा नेण्याची तयारी सुरु केली असून आगामी काळामध्ये आपला मुख्यमंत्री करण्यासाठी बुथ कमिट्या या सक्षम करुन एक दिलाने काम करावे लागणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले. दरम्यान आजच्या सभेमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी युवकांनी कामाला लागावे असा सूर सर्वांनीच व्यक्त केला. तर दुसरीकडे सुजित झावरे यांनी आपण प्रसार आणि प्रसिध्दीमध्ये कमी पडतो अशी कबुली त्यांनी यावेळी केली.
शनिवारी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये वन बुथ टेन युथ अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ.राहुल जगताप, अविनाश अदिक, सुजीत झावरे, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, अभिजीत खोसे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
संग्राम कोते म्हणाले की, भाजपची सत्ता आल्यापासून नुसता घोषणांचा पाऊस पडला आहे. आज युवकांचे अनेक प्रश्न सुटू शकले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत 34 मोर्च राज्यात काढले तरीही सरकारला जाग आली नाही. हे शासन आल्यापासून शिष्यवृत्त्या बंद झाल्या. ज्या चांगल्या बँका सुरु होत्या त्यातील नोकर भरतीमध्ये कपात झाली. नोटाबंदीनंतर देशामध्ये 41 लाख लोकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. विद्यापीठामध्ये आज आर.एस.एसची प्रणाली लादण्याचा विषय होत आहे. आता आपल्याला संघर्ष उभा करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे. आगामी काळामध्ये युवक काँगे्रसच्या वतीने विधानभवनावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात आपला मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला बुथ कमट्या मजबुत करणे व पक्षासाठी काम करणे महत्त्वाचे असून युवकांनी आता जागृत राहून कामा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष घुले म्हणाले की, राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवारांना मुख्यमंत्री पाहिजे असेल तर आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यासाठी आपला पाया भक्कम पाहिजे.आपल्याला संघटनेचे जाळे गावागावात उभे करावे लागणार आहे. आज बदलत्या काळानुसार जो जनरेशन गॅप आहे तो आपल्याला भरुन काढायचा आहे. युवकांना आता अपडेट रहावे लागणार आहे असे ते म्हणाले, आ.राहुल जगताप म्हणाले की, पक्षामध्ये सर्वांनाच काम करण्याची संधी मिळाली पाहिजे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या ठिकाणी सुध्दा संधी मिळू शकते त्यासाठी बुथ कमीट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नुसतेच नेत्यांचा आर्शिर्वाद नको,आपण काम करावे, इतर पक्ष काय करतात यापेक्षा आपण आपली पक्षाची रेषा मोठी करायची असे ते म्हणाले