ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - सुनिलगिरीजी महाराज
कुकाणाः प्रतिनिधी
माणसापेक्षा त्याचे कर्तव्य मोठे असते, ढोर कष्टापेक्षा बौद्धिक कष्टाला महत्त्व दिले पाहिजे. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास शुन्यातुन जग निर्माण करता येते. असे प्रतिपादन महंत सुनिलगिरीजी महाराज यांनी केले. अंतरवाली(ता.नेवासा) येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील बचत ठेव योजना अंतर्गत ज्ञानेश्वर बचत गट, ओमसाई बचत गट व गुरूदत्त बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपानराव वाबळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस हेडकाँन्स्टेबल संजय गायकवाड, सेवा निवृत्त प्राचार्य दादासाहेब वाबळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित, नांदुर शिकारी चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रखमाजी लिपणे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष उत्तमराव वाबळे, संदीप वाबळे, मनोहर भंडारी, विजय वाबळे, सुभाषराव देशमुख , माजी सरपंच राजेंद्र वाबळे आदि मान्यवर उपस्थित होते. बचत ठेव योजनेचे अध्यक्ष प्रा. भारत वाबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बचत गटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन महंत सुनिलगिरीजी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य वाबळे, पो. हे. काँ. गायकवाड, दिलीपराव वाबळे, यास्मिन शेख यांची भाषणे झाली. यावेळी प्रा.सचिन देशमुख, बचत गटाचे उपाध्यक्ष बापुसाहेब वाबळे यांच्यासह बचत गटाचे सर्व पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक कृष्णा थोरात यांनी केले. तर बचत गटाचे सहसचिव दिपक वाबळे यांनी आभार मानले.
