म्यानमारवरील राष्ट्रीय आणीबाणी उठणार
वॉशिंग्टन, दि. 16 - लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकताना देशात नागरी सरकार स्थापन केल्याने बराक ओबामा सरकार म्यानमारवर लादलेले सर्व निर्बंध उठविणार आहे. म्यानमारच्या नेत्या आणि परराष्ट्रमंत्री ऑन सान सू की आणि ओबामा यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. हुकूमशाही व्यवस्थेमुळे अमेरिकेने भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारविरुद्ध राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. याअंतर्गत आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादले होते. गेल्या काही महिन्यांपासून म्यानमारमधील घडामोडी पाहता, नागरिकांच्या हितासाठी म्यानमार सरकार वेगाने पावले उचलत असल्याचे आम्ही पाहात आहोत. त्याचेच बक्षीस म्हणून लवकरच सर्वच प्रकारचे निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे.