शाश्वत विकासासाठी जलयुक्त शिवार अभियान
। अण्णा हजारे यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 30 - देश बदलायचा असेल, तर आधी गाव बदलायला हवे. खेड्यातल्या माणसांच्या भाकरीचा प्रश्न हा कृषी विभागाच्या हातात आहे. गाव बदलायचं असेल, तर जलयुक्त हा एक क्रांतीकारी निर्णय आहे. आपण प्रकृतीचे शोषण करीत आहोत. हा शाश्वत विकास नाही. शाश्वत विकासासाठी जलयुक्त शिवार अभियानाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16चा राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जिल्हाधिकारी अनिल कवडे, विभागीय कृषी सहसंचालक विजय इंगळे, संदीप नवले यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री. हजारे बोलत होते. याप्रसंगी राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बर्हाटे, वन अधिकारी लक्ष्मी, सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, शिरीष जाधव, अशोक संसारे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हजारे पुढे म्हणाले की, जनतेच्या सेवेतूनच खरा आनंद मिळतो. अखंड आनंद हवा असेल, तर जनतेची सेवा करा. आपण ज्या गावात काम करतो त्याला प्रपंच माना. कवडे, इंगळे व नवले यांनी जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव म्हणजे हा जिल्ह्याचा गौरव आहे, असे ते म्हणाले.
पोपट पवार म्हणाले की, कृषी विभाग हा शेतकर्यांचा आत्मा आहे. गाडगेबाबांनी केलेली क्रांती कृषी विभाग करीत आहे. जलसंधारणाचा फायदा घेतला पाहिजे. राळेगण, हिवरेबाजारपेक्षा चांगली कामे केलेली गावे आहेत. मात्र, त्यांनी यात सातत्य ठेवणे गरजेचे होते. शाश्वत विकासाबरोबर शाश्वत आनंद मिळाला पाहिजे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले की, सर्व खात्यांच्या यंत्रणांनी सहभाग नोंदवला. म्हणूनच आपण बक्षिसास पात्र ठरलो. कर्मचार्याची प्रतिष्ठा ही त्याच्या कामातून निर्माण झाली पाहिजे. शासकीय नोकरी ही खूप मोठी संधी आहे. या संधीचा कोण कसा उपयोग करतो, हे महत्त्वाचे आहे. अण्णा हजारे व पोपट पवार यांनी आपल्या गावाचा गौरव देश पातळीवर केला. ही जिल्ह्याच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.
