Breaking News

दखल संभाजी भिडे गुरुजींचा जावईशोध

या देशात कुणीही उठावं आणि काहीही बोलावं असा जणू प्रघात पडत चालला आहे. संभाजी महाराजांची सध्या एका वाहिनीवर मालिका चालू आहे. त्यात शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे किती विज्ञानवादी होते. त्यांच्याकडं अंधश्रद्धांना कसा थारा नव्हता, हे दाखविण्यात आलं आहे. केवळ मालिकांतच नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही शिवाजी महाराज व संभाजी महाराज तसेच होते. त्यांचं नाव घेऊन वावरणारे मात्र छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची शिकवण पायदळी तुडवित आहेत. 
....................................................................................................................................................
शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या सैन्यात मुस्लिमांचा भरणा होता. त्यांचा मुस्लिमांना विरोध नव्हता, तर प्रजेचा छळ करणार्‍यांना होता. स्वकीयांनाही महाराजांनी खड्यासारखं बाजूला सारलं. केवळ मुस्लीम आहे, म्हणून त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या संत तुकाराम महाराजांनी नवससाायासे होती मुले, तर का करावा लागे पती असा सवाल केला होता. ते स्वतः विज्ञानवादी होते. असं असताना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मुस्लिमद्वेषाचं राजकारण करणार्‍यांना खर्‍या अर्थानं शिवाजी महाराज कितपत समजले, हा संशोधनाचा विषय आहे. संभाजी महाराज धर्मप्रेमी होते, धर्मद्वेषी नव्हते. संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन आईवडीलांनी नाव संभाजी ठेवलं, तरी संभाजी महाराजांसारखं वागणं जमत नसतं. संभाजी भिडे हे त्यातील एक नावं. सांगलीत जातीय दंगल घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्य घटना त्यांना मान्य नाही. या देशात राहायचं आणि राज्यघटना मान्य नसायची, हा देशद्रोह झाला. शिवाजी महाराजांच्या नावावर निधी जमा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली आहे का, त्याचा हिशेब देण्याची काय व्यवस्था आहे, असे सारे प्रश्‍न अनुत्तरीत असताना जातीय विद्वेष पसरविण्याचं काम करणार्‍या भिडे गुरूजींना राज्य सरकारही पाठिशी घालत आहे.
पंतप्रधानांपासून अनेक नेते जिथं शास्त्रीय विधान करण्याऐवजी अंधश्रद्धा निर्माण करणारी विधानं करतात, तिथं संभाजी भिडे गुरुजीही करीत असतील, तर त्याच नवल काय़? माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यानं जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. लग्न होऊन 15 वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्‍चित मुलं होतील. मी आतापर्यंत 180 हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे. ही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी या वेळी सांगितलं. संभाजी भिडे यांचं विधान हे अंधश्रद्धा पसरविणारंअसून त्यांच्याविरोधात जादूटोणा व अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करायला हवा. त्यातला आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा भिडे गुरुजींनी 180 हून जास्त जोडप्यांना आंब्याची फळं खायला दिली आणि त्यातील दीडशे जणांनाच अपत्यप्राप्ती झाली असेल, तर तीस जोडप्यांना हा आंबा फलदायी ठरला नाही, असं म्हणता येईल. डॉ. बाालजी तांबे यांच्यासारख्यांवर मुलगाच होण्यासाठीच्या औषधोपचारावरून गुन्हा दाखल होत असेल, तर संभाजी भिडे यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा. भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
भिडे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भिडे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांना ते आपल्याला कोणत्या युगात नेत आहेत हे पाहावं असंही त्यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात जे सरकार आहे, त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना विज्ञानावरच विश्‍वास नाही. देशाचे शिक्षण मंत्रीच म्हटले होते, की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. अशा प्रकारची वक्तव्यं ऐकायला मिळत आहेत. ही बाब खरोखर दुर्दैवी आहे. या वक्तव्यांचा मी एक महिला म्हणून निषेध करते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज महिलांचा अशा वक्तव्यांमधून अपमान केला जातोय. महिलांना समान अधिकार देण्याचं धोरण सर्वात आधी महाराष्ट्रात आलं. अशा महाराष्ट्रात महिलांचा या प्रकारे अपमान होणे अत्यंत खेदजनक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मोदी यांनी जिथं गणपती हे जगातलं अवयरोपणाचं पहिलं मोठं उदाहरण आहे, असं म्हटलं, तिथं आता अशी विधानं होण्यात कोणी गैर मानणार नाही. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवदत्त यांनी मध्ये असंच महाभारत काळात इंटरनेट होतं. असं म्हटलं होतं. गुजरातच्या नेत्यांनीही अशीच काहीशी वादग्रस्त विधानं केली होती. सीतेचा जन्म धरणीतून झाला असं सांगताना त्या वेळी आतासारखं टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान अस्तित्त्वात होतं, असं म्हणण्यापर्यंत काही नेत्यांची मजल गेली. देशाच्या राज्यघटनेत मंत्र्यांना शपथ घेताना राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व पाळण्याचं वचन द्यावं लागतं. भारतीय राज्यघटनेनं वैज्ञानिकतेची कास धरली आहे. असं असताना अंधश्रद्धा जोपासणारी विधानं व्हायला नकोत; परंतु त्याची कोणतीही फिकीर न करता सर्रास राज्यघटनेची मूल्य पायदळी तुडविली जात असतील, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोण घेणार?