Breaking News

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा


शेवगाव / प्रतिनिधी

जून महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्यामुळे ग्रामीण भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस लांबल्यामुळे कृषी सेवा केंद्र देखील ओस पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

शेवगाव तालुक्यात १ आणि २ जून ला मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यंदा दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची सुरू केल्या होत्या. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला असताना पावसाने मात्र पाठ फिरविली. गेल्या वर्षी एक जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. १ ते १५ जूनपर्यंत जिल्ह्यात संगमनेर अकोले, श्रीरामपूर वगळता अन्य तालुक्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. जूनच्या पंधरवाड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. १५ जूननंतर तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. जुलै महिना मात्र कोरडा गेला होता. तरीदेखील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाला दमदार सुरुवात झाली. तर ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपाच्या साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. 

यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने कृषी सेवा केंद्र ओस पडलेले दिसत आहेत. येत्या आठवड्याभरात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या वर्षी बोंड अळीने हतबल झालेल्या बळीराजाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.