Breaking News

कोकण पदवीधर मतदारसंघात सर्वच पक्षांची ताकद पणाला

रत्नागिरी - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बदललेल्या अनेक संदर्भांमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हटल्या जाणार्‍या या मतदारसंघावर गेल्या वेळी ज्या निरंजन डावखरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले, ते डावखरे आता भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पालघर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर भाजप-शिवसेनेमधील राजकीय संघर्ष पेटला असल्याने भाजपच्या परंपरागत मतदारसंघात प्रथमच शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा आतापर्यंत शिवसेनेने लढवलेली नव्हती. यावेळी मात्र शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. उमेदवार बदलला, तरी गेल्या वेळची आपली हक्काची जागा पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे येत्या 25 जून रोजी होणारी ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.


नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे वडील आणि पक्षाचेच माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कष्ट घेतले. तसेच कष्ट त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी घेतले, तरच राष्ट्रवादीला पदवीधर मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखणे शक्य होणार आहे. तसेच घराणेशाहीचा आरोप पुसून काढण्यासाठी तटकरे यांना ही नामी संधी आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी मिळाली आहे. सुनील तटकरे यांनी महत्त्वाची पदे आपल्या घरात ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. नुकतेच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा माजी आमदार गणेश नाईक यांना हवी होती. मात्र तटकरे यांनी आपले वजन वापरून ती मुलासाठी मिळवली. त्यामुळे नाईक नाराज होते. आमदार भास्कर जाधव यांना विश्‍वावसात न घेतल्यामुळे तेही नाराज होते. पक्षांतर्गत नाराजी असताना तटकरे यांनी विधान परिषदेत मोठ्या फरकाने मुलाला निवडून आले. राष्ट्रवादीने घराणेशाहीचा आरोप पुसून काढण्यासाठी आता एका कार्यकर्त्याला निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. अनिकेतच्या विजयासाठी तटकरे यांना भाजपाची साथ लाभली. नारायण राणेही तटकरे यांच्या मदतीला धावले. त्यामुळे तटकरे त्याची परतफेड करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देणार, याबाबत उत्सुकता आहे. नवी मुंबईतून मुल्ला यांच्या पाठीमागे गणेश नाईक किती बळ उभे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना भाजपला कोकण पदवीधर मतदारसंघात आव्हान देणार आहे. त्यामुळे गेल्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांना पडद्यामागून साथ देणार्या-या शिवसेनेसोबत आता दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी याही निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार लढत अपेक्षित आहे. शिवसेनेची नवी मुंबई, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यावर भिस्त आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात शिवसेनेला भाजपच्या विरोधकांची साथ मिळाल्यास सेनेला कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा अवघड नाही. शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेनी षड्डू ठोकला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतर निरंजन डावखरे कोठेही चर्चेत नव्हते. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यांनी मतदारसंघात भरपूर काम केल्याचे भाजपकडून आता सांगितले जात असले, तरी डावखरे यांनी शैक्षणिक प्रश्‍न मांडल्याचे ऐकिवात नाही. स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यामुळे भाजप आणि डावखरेंबद्दलच्या नाराजीचा फायदा विरोधक कितपत उचलतात, हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.