जामनेरच्या ‘त्या’ घटनेचा राहुरीत तीव्र निषेध; लहान मुलांनी पोलिसांना दिले निवेदन
राहुरी : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर { ता. वाकडी } या गावी मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना शेतातल्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्या जमीन मालकाने त्या मुलांना जबर मारहाण केली. त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढली. या घटनेच्या निषेधार्थ आज { दि. १५ } अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. यावेळी लहान मुलांच्या हस्ते पोलिसांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, भारतीय संविधानाने अनुच्छेद १४ नुसार कायद्यासमोर सगळे समान असल्याचे म्हटले आहे. अनुच्छेद १५ नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई केली. अनुच्छेद १६ नुसार सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबीमध्ये समान संधी दिली आणि अनुच्छेद १८ नुसार अस्पृश्यता नष्ट केली गेल्याचे जाहीर केले. आणि १९८९ ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम लागू करून जातीयवाद संपविण्याकडे सरकारने पाऊल उचलले.
मात्र असे असतांना राज्यात अशा घटना महामानवाच्या कर्तृत्वाला कलंकित करणाऱ्या आहेत. राज्यघटनेला पायदळी तुडवून महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. लातूरची {ता. रौद्रवाडी, जि. उदगीर } घटना घडून आता महिना होत आला. परंतु मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी कुठलेच मत व्यक्त नाही केले. त्यामुळे सरकारने अत्याचार पिडितांचे सुयोग्य पुनर्वसन करून त्यांना सन्मानित करावे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या मोर्चात क्रांतीवीर लहुजी टायगर सेनेचे कांतीलाल जगधने, राजेंद्र जगधने, संतोष भोसले, बाबासाहेब शेलार, आर. पी. आय. चे निलेश जगधने, सचिन साळवे, श्रमिक मुक्ती दल व विद्रोही चळवळीचे डॉ. जालिंदर घिगे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे संदीप कोकाटे, रोहित तेलतुंबडे, विजू ब्रदर, लक्ष्मण गायकवाड, लखन शेंडगे, मुकेश वैराळ, उमा जगधने आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.