Breaking News

बुरसटलेल्या विचारांनी महिलांची अपप्रतिष्ठा

किरण जगताप / कुळधरण । 
ग्रामीण भागातील समाजरचनेत ’जुने ते सोने’ च्या नावाखाली जुनाट रूढी परंपरा जोमाने पोसल्या जातात. अशिक्षित व अल्प शिक्षित समाज या विचारांचा भोक्ता असतो. भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वकाही सत्य, विश्‍वसनीय, शाश्‍वत असल्याच्या दिवास्वप्नात यातील बहुसंख्य राहतात. डोळसपणाचा अभाव असलेल्या परिवारात नव्या विचारांना स्थान नसते. जे मागील पिढ्यांपासून चालत आले ते पुढे घेवून जाण्याचा त्यांचा ध्यास असतो. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरण्याची मानसिकता नसल्याने वास्तवाचा शोध घेणे त्यांना पटत नाही. गावगाड्यात मात्र याच गोष्टींना प्राधान्य देवुन जीवनक्रम आखला जातो.
महिलांना समतेची वागणूक आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त न होण्याचे कारण यातच दडले आहे.’ठेविले अनंते तैसेची रहावे’,’पायीची वहाण पायी बरी’ अशा कित्येक उक्तींचा विपर्यास करुन दुसर्‍याचे सामाजिक स्थान तसेच कायम ठेवण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असते. कित्येक कुटुंबात होत असलेल्या नित्याच्या संवादातून हाच विचार पुढे जाताना दिसतो. स्री-पुरुष समानतेच्या शिकवणीऐवजी विषमतेचे बीज पेरले जाते.कुटुंबात मुलांच्या कामाचे वाटप करतानाच स्री-पुरुष असा भेद होताना दिसतो. भांडी घासणे, घर स्वच्छ करणे, कपडे धुणे अशी कामे मुलींनीच करायची असतात अशी शिकवण होते. पुढे त्याच घटना, प्रसंगातुन बोध घेत व्यक्तीचा वैचारिक पिंड तयार होतो, आणि बदल न स्विकारण्याच्या मानसिकतेचा पाया रचला जातो.
तू मुलगी आहेस, म्हणून तुला बर्‍याच गोष्टी करता येणार नाहीत असे अनेक मार्गांनी ठसविले जाते. पुर्वजांनी जे केले तेच आपण करावे, चालीरिती, नियम-बंधने पाळावीत, स्री दुबळी असते. असे कित्येक विचार लादले जात असल्याने मुलींच्या वैचारिक प्रगल्भतेला तडा जातो. जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा बाळगून प्रगती साधण्याच्या काळात त्यांच्यातील उमेद कमी होवु लागते. बुरसटलेल्या विचारांची सामाजिक परिस्थितीच त्यांच्या प्रगतीला अडसर ठरते.
ग्रामीण भागात बालविवाहाची सामाजिक समस्याही अशाच मागास विचारातुन उद्भवताना दिसते. मुलगी हे परक्याच धन समजुन तीला बालवयातच संसारात गुंतविले जाते. हसण्याबागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात त्यांचे विवाह करुन दिले जातात. मानसिक व शारिरीक परिपक्वता नसताना मुलींना संसारात गोवले जाते. आर्थिक परिस्थिती, शिक्षणाचा अभाव, रुढीपरंपरा, आईवडिलांना वाटणारे मुलींचे ओझे अशा अनेक कारणांनी बालविवाह होतात. मुलींवर असलेला अविश्‍वास हेही बालविवाहाचे ठळक कारण आहे.
जुनाट रूढी परंपरांच्या प्रवाहात मुलींना अनेक प्रकारे भरडले जाते. कित्येक कुटुंबात मुली व महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळे बसायला लावण्याची पध्दत रुढ आहे. देव कोपतो, भूतबाधा होते अशा कित्येक कारणांनी त्यांना या काळात वंचित ठेवले जाते. इतर व्यक्ती-वस्तुंना स्पर्श करणे, देवपुजा, स्वयंपाक अशा बाबी वर्ज्य मानल्या जातात.एवढेच नाहीतर स्पर्श झाल्यास इतर व्यक्तींना अंगात येण्याचा प्रकारही ग्रामीण भागात पहावयास मिळतो. या सर्व बुरसटलेल्या विचारांनी महिलांची अप्रतिष्ठाच होताना दिसते. अंधश्रध्दांनी ग्रासलेल्या या समाजाला शिक्षण आणि परिवर्तनवादी विचारांचे धडे दिल्याशिवाय हे प्रकार थोपवता येणे शक्य होणार नाही.