Breaking News

पारनेर शहरात साम्राज्य, उघड्या गटारींची बिकट अवस्था

पारनेर शहरातील राहुलनगर, संभाजीनगर, आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, नागेश्‍वर गल्ली, बोळकोबा गल्ली, एडीसीसी बँक परिसर, आनंद हॉस्पीटल परिसर या ठिकाणी नगरपंचायतकडून नागरी सुविधा अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन, रस्त्याच्या कडेला उघड्या गटारी करण्यात आलेल्या आहेत. या गटारी काही ठिकाणी नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत तर, काही ठिकाणी या गटारीत माती, कचरा असल्याने पुर्ण भरुन गेलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरवासियांना जागोजागी दुर्गंधीयुक्त तळे साचलेचा अनुभव मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, पारनेर नगरपंचायतीकडून सर्व प्रभागासाठी लाखो रुपये खर्च करुन, उघड्या गटारी करण्यात आलेल्या आहेत. या गटारी काही ठिकाणी पुर्ण बंद झालेल्या आहेत. पावसाळा सुरु होण्या पुर्वीच गटारी साफ होणे गरजेचे होते, परंतु नगरपंचायतकडून असे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. बसस्थानक परिसरात अतिक्रमण ग्रस्तांनी गटारीवर टपर्‍यांचे अतिक्रमण केल्याने गटारी बंद झालेल्या आहेत. संभाजीनगर, ग्रामीण रुग्णालय, एडीसीसी बँक, इंदिरानगर या ठिकाणीही दुर्गंधीयुक्त पाण्याचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोरील गटारी बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. येत्या दोन तीन दिवसात भरपूर प्रमाणात पाऊस झाला तर, पारनेरकरांना शहरात जागोजागी तळे साचल्याचा अनुभव येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिक असंतोष व्यक्त करत आहेत.