Breaking News

तलाठ्याची नेमणूक करा ; अन्यथा आंदोलन : पवार


सुपा I प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले, ज्येष्ठ नागरिकांसह शेतकऱ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, व शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी बदली झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन तलाठ्याची नेमणूक करण्यात यावी. अन्यथा तहसील कार्यालयात ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार यांनी दिला.

यासंदर्भात पवार यांनी तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, सुपा येथे कार्यरत असणारे तलाठी ढगे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या तलाठ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांनी पूर्वीचा पदभार अद्याप सोडलेला नाही. ते कार्यालयात उपस्थितही राहत नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारे दाखले, उतारे मिळत नाहीत. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यासाठी नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या तलाठी यांना सुपा येथील सजेचा कार्यभार स्विकारण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेश द्यावेत. तलाठी सजेवर हजर न झाल्यास दोन दिवसांमध्ये सुपा ग्रामस्थांसह तहसील कार्यालयातील दालनात आंदोलन करण्यात येईल.