Breaking News

बदली प्रक्रियेत सुधारणा करून न्याय मिळवून द्या : परजणे

कोपरगाव शहर प्रतिनिधी 

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबतची मोहिम राज्याच्या शिक्षण विभागाने हाती घेत प्रत्येक जिल्ह्यात ती राबविली. परंतु या बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षक व शिक्षकांवर मोठय़ा प्रमाणावर अन्याय झाला आहे. या बदली प्रक्रियेत सुधारणा करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे. 

यासंदर्भात परजणे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, राज्यभरातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया मे २०१८ मध्ये राबवण्यात आली. या प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांनी अपंगत्वाचे आणि दुर्धर आजाराचे खोटे पुरावे सादर केले. आपापल्या सोयीनुसार बदल्या करून घेतल्या. परिणामी जिल्ह्यातील सुमारे सहाशेपेक्षा अधिक शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले. हे शिक्षक मानसिक तणावाखाली आहेत. या विस्थापितांमध्ये महिला शिक्षकांची संख्या सुमारे ७० टक्के आहे. शिक्षकांनी ऑनलाइन बदली अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जाची कोणतीही पडताळणी न करता बदल्या करण्यात आल्या. पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेताना अनेक शिक्षकांनी चुकीची अंतरे दाखवून बदल्या करून घेतल्या. मात्र त्यामुळे खरे लाभधारक विस्थापित झाले आहेत. अनेक पती-पत्नी यांच्या बदल्या १५० ते २०० किलोमीटर अंतरापर्यंत झालेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 

विधवा शिक्षिका तसेच दुर्धर आजार असलेले शिक्षक शिक्षकांचाही नियुक्त्या दूर अंतरावर गैरसोयीच्या आणि अडवळणाच्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यांना प्रवासासाठी अनंत अडचणी येत आहेत. या शिक्षकांचा सेवाकाळ एक किंवा दोन वर्षे राहिलेला आहे. अशा शिक्षक व शिक्षकांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत. या प्रक्रियेमुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यांच्यातील अनास्थेमुळे शालेय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. या बदली प्रक्रियेची राज्यस्तरावरून दखल घेण्यात यावी. जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या विस्थापित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय व्हावा, असे परजणे यांनी निवेदनात म्हटले आहे.