Breaking News

राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत संस्कार बालभवनचे यश


।संगमनेर/प्रतिनिधी।२२

अ.भा.सांस्कृतिक संघ, पुणे आणि ग्लोबल कौंसिल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑल इंडिया ड्रामा, डान्स, म्युझीक फेस्टिव्हल’मध्ये संस्कार बालभवनने उत्कृष्ट यश मिळविले. भरतनाट्यम् व ओडिसी या भारतीय नृत्यशैलीवर आधारित विविध नृत्याविष्कार सादर करतांना बालभवनच्या मुलांनी बक्षिसांची लयलुट केली. सहा मुलांनी या स्पर्धेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा चेअरमन अवॉर्ड पटकावित संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप निर्माण केली. दरवर्षी पुण्यात आयोजित होणार्‍या या राष्ट्रीय महोत्सवात देशभरातील १८ राज्यातील ७ हजार ५०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. दहा दिवस चाललेल्या या महोत्सवात दोन हजार पाचशेहून अधिक कार्यक्रम सादर झाले.

बालभवनच्या प्रतिक पानसरे, मिताली भडांगे, खुशी भोत, आदिश्री झंवर, शिवानी शहाणे, मधुरा गुंजाळ यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करीत प्रतिष्ठेचा चेअरमन अ‍ॅवार्ड पटकाविला. तर याच स्पर्धकांसह रिया डहाळे व जेधे यांनी ओडिसी नृत्य सादर करीत तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धकांना सोनाली महोपात्रा यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रेया वनम, सेजल सातपूते, शर्वरी चव्हाण, रुचा भालेराव, वृष्टी पटेल, साक्षी दंडवते, श्रावणी देशमुख आणि साक्षी मिस्कीन यांनी भरतनाट्यम् सादर करीत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धकांना कुसुम इंगळे-गुंदेचा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन केल्याबद्दल बालभवनच्या नृत्य प्रशिक्षिका कुसुम इंगळे-गुंदेचा यांना विशेष पुरस्कार देऊनही सन्मानीत करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या या दुसर्‍या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत बालभवनच्या मुलांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी, गीता परिवाराचे सहसचिव गिरीश डागा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.