Breaking News

वाहनात बसलेल्यांना धूळ कळत नाही : आ. थोरात


आपल्याविरुध्द जनतेच्या मनातील रोष न कळलेले हे सरकार २०१९ मध्ये सत्तेत परतणार नाही. वाहनात बसलेल्यांना मागे उडत असलेली धूळ कळत नाही. या सरकारचे तसेच झाले आहे, असे टिकास्त्र काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत भाजप सरकारवर सोडले दिला.

विधानसभेतील अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करतांना माजी महसूलमंत्री आ. थोरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातच रस असल्याने चंद्रकांत पाटील यांचे महसूल खात्याकडे दुर्लक्ष झाले, अशी टीका केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, सातबारा उतारा ऑनलाईन देण्याची योजना ठप्प आहे. कुटुंबातील कुटुंबात संपत्तीचे हस्तांतरण झाले तर त्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय या सरकारने जाहीर केला. त्याची भरपूर प्रसिध्दीदेखील मिळवून घेतली. पण प्रत्यक्षात त्याबाबतचा आदेश अजूनही निघालेला नाही. एखादा निर्णय यशस्वी व्हायचा असेल तर मंत्री मुख्यमंत्र्यांची त्यासाठी बांधिलकी असावी लागते. समृध्दी महामार्ग धावतोय पण सातबारा मात्र धावत नाही, ते यामुळेच.

कृषीमंत्र्यांचे केवळ कृषी विभागावर नव्हे तर सहकार, पणन, मदत, पुनर्वसन अशा विविध खात्यांत जरब असली पाहिजे. पण कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे तसे दिसत नाही, हे सांगतानाच आ. थोरात यांनी पूर्वीप्रमाणे पीक आढावा बैठकी मुख्यमंत्र्यांनी स्वत: घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सरकार फक्त जाहिरातबाजी करत असून कोणतेही विकासाचे काम करत नाही.