Breaking News

अडीच हजार वटवृक्षांचे रोपण : तांबे वटवृक्ष लागवड सप्ताह सुरु



संगमनेर प्रतिनिधी

हरित सृष्टीसह पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देणार्‍या दंडकारण्य अभियानाअंतर्गत प्रत्येक वाडीवस्तीवर २ हजार ५०० वटवृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली.

सह्याद्री विद्यालय येथे वटवृक्ष लागवड सप्ताहाची नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी तांबे बोलत होते. मुख्य प्रवर्तक आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, बाळासाहेब फापाळे, बंटी साळवे, नामदेव कहांडळ आदींसह प्रचार, प्रसार कला पथकातील सदस्य उपस्थित होते. 

सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे १३ वे वर्ष आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहेत. भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा असणार वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. त्यामुळेच वटवृक्ष लागवड सप्ताह आयोजित केल्याचे तांबे म्हणाल्या. 

दरम्यान, वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनींच्या हस्ते या वडाच्या झाडाचे रोपण करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणार आहे.