Breaking News

स्त्री ही जगाची उद्गात्री आहे : मनिषा वायकर


 स्त्री ही जगाची उद्गात्री असून इतिहासाच्या पटलावर नांव कोरणाऱ्या अनेक महापुरुषांचा तीच उदयाचल असल्याचे निर्विवाद सत्य इतिहासात डोकावल्यावर आढळून येते. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदयाचल राजमाता जिजाऊच होत्या. त्याचप्रमाणे अनेक महापुरुषांच्या यशस्वी जीवनात स्त्रीचाच सिंहीणीचा वाटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

एवढेच नव्हे तर प्राचीन काळात राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आहिल्यादेवी होळकर, पंडिता रायबाघन आदी कर्तबगार स्त्रियांसह अर्वाचिन काळात, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अरुणा असफअली, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन, पी.टी. उषा, किरण बेदी, सानिया मिर्झा यांच्यासारख्या कित्येक स्त्रियांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. असे वक्तव्य पंचायत समितीच्या सदस्या मनिषा वायकर यांनी केले.

पाथर्डी शहरातील सुप्रसिद्ध विठोबा राजे लॉन्सवर, जागतिक महिलादिन निमीत्ताने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर अध्यक्षस्थानी होत्या. पंचायत समिती सदस्या सुनिता दौंड, शीला खेडकर, बालविकास प्रकल्प अधिकारी मिना गावित, रंजना देवढे, आश्विनी घनवट, मंगल केदार, मंदा बडे, आश्राबाई खेडकर, कविता बनसोडे या महिलांसह, गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, तालुका आरोग्याधिकारी भगवान दराडे, नायब तहसिलदार रमेश ससाणे, विस्तार अधिकारी तानाजी कोकाटे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बचत गटांच्या सदस्या, अंगणवाडी सेविका व इतर क्षेत्रांतील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.