Breaking News

वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी


।संगमनेर/प्रतिनिधी।

यावर्षी हवामान खात्याच्या तंतोतंत जुळलेल्या अंदाजानुसार मान्सून अगदी वेळेवर भारतात दाखल झाला. संगमनेर तालुक्यात शुक्रवारी {दि. १ } मान्सून सरींचे आगमन जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाने झाले आहे. दुपारी तीन ते चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. 

या वादळी पावसाने तालुक्यातील वडगावपान, कोकणगाव, समनापूर, निंगावजाळी, चिंचपूर त्याचबरोबर पठारभागातील घारगाव, माळवाडी, बोट याठिकाणी चांगलीच दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून रस्त्यावर आली. घरांच्या छतावरील पत्रे वाऱ्यामुळे उडाली. राजकारणी पुढाऱ्यांची शुभेच्छा फलके वाऱ्यावर उडाली. संगमनेर लोणी रस्त्यालगत वडगाव टोलनाक्याजवळील स्वामी समर्थ मंदिराची सुरक्षा भिंत या वादळी वाऱ्यामुळे पडली. यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर रस्त्यालगत असणारी छोट्या दुकानदारांच्या टपऱ्यांचेदेखील नुकसान झाले. तासभर झालेल्या वादळामुळे एकूण किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी मान्सून सरींची सुरुवात वेळेवर झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.