Breaking News

प्राप्तिकरदात्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण

नवी दिल्ली, दि. 01 -  प्राप्तिकरदात्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण होण्यासाठी प्राप्तिकर खात्याने ई-निवारण अर्ज जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे अर्ज जारी केले जातील. प्राप्तिकरदात्यांना देण्यात येणारा परतावा व इतर तक्रारींबाबत वैयक्तिक एसएमएस तसेच ई-मेलद्वारे प्राप्तिकरदाते आपल्या तक्रारी पाठवू शकतील.
ई-प्राप्तिकर विवरणपत्रांप्रमाणेच हा नवा अर्ज असून खात्याने तो तयार केला आहे. लवकरच तो प्रसिद्ध केला जाईल. या एका पानाच्या अर्जात करदात्याने आपले नाव, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे तक्रार निवारण झालेली संबंधित व्यक्तीला आपोआप कळवले जाईल. तसेच आपली तक्रार सविस्तरपणे लिहिण्यासाठी पुरेशी जागाही अर्जात ठेवली आहे. या नव्या अर्जामुळे करदात्याला आपली तक्रार ई-फायलिंगप्रमाणेच इंटरनेटसक्षम संगणकाचा वापर करून निवारण करून घेता येईल आणि त्याला कार्यालयापर्यंत येण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. ई-निवारण अर्ज खात्याच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डेटाबेसशी जोडला जाणार असून त्यामुळे तक्रारीचे निवारण झटपट केले जाईल.
हा अर्ज लवकरच अधिसूचित केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. खात्याच्या अधिकृत ई-फायलिंग वेबसाईटवर अर्ज ऑनलाईन भरता येईल अथवा आयकर संपर्क केंद्रात प्रत्यक्ष जाऊन भरता येईल. देशात 260 शहरांमध्ये अशी केंद्रे सुरू केली आहेत. अर्ज दाखल केल्यावर खात्यातर्फे युनिक ग्रिव्हान्स आयडी दिला जाईल आणि तक्रार दूर करण्यास विलंब झाला तर कर अधिका-यांशी पत्रव्यवहार करताना करदात्याला त्याचा संदर्भ देता येईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या वर्षाच्या सुरुवातीसच करदात्यांच्या तक्रारींचा जलदीने निपटारा करण्यासाठी ई-निवारणचा आराखडा तयार केला आहे. खात्याकडे आलेल्या सर्व ऑनलाईन व प्रत्यक्ष तक्रारी एकत्र करून त्यांची तार्किक सुसंगतीपर्यंत त्यांची माहिती घेत राहण्याची काळजी यात घेण्यात आली आहे.