Breaking News

माहिती तंत्रज्ञान, कम्युनिकेशन क्षेत्रात राज्यात गुंतवणुकीची पोर्तुगालची तयारी



मुंबई : उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून पोर्तुगाल देशातील गुंतवणूकदार देखील महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती पोर्तुगालमधील एका शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन दिली.

दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशातील राजकीय तसेच व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून पोर्तुगालचे एक शिष्टमंडळ मुंबईत आले होते. यावेळी शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.

माहिती, तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन क्षेत्रात पोर्तुगालची कामगिरी उत्तम असून भारतासोबत या क्षेत्रात काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच ऊर्जा, रस्ते, रेल्वे, फार्मा आदी क्षेत्रात काम करण्याची तयारी असल्याचे तसेच स्थानिक कंपन्यांसोबत समन्वय ठेवून उद्योग विस्तार करण्याची तयारी असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.