Breaking News

नक्षलवादी हल्ल्यात 9 जवान शहीद केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 212 व्या बटालियनवर हल्ला

सुकमा/वृत्तसंस्था : नक्षलवाद्यांनी घडविलेल्या शक्तिशाली आयईडी स्फोटात 9 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडविला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 212 व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर येथे वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांमध्ये एएसआय आर. के. एस. तोमर, मुख्य हवालदार लक्ष्मण आणि हवालदार अजय यादव, मनोरंजन लंका, जितेंद्र सिंह, शोभित शर्मा, मनोज सिंह, धर्मेंद्र सिंह, चंद्रा एच. एस. यांचा समावेश आहे. 
घटनास्थळी सुरक्षा दल पोहोचले असून सध्या गोळीबार सुरू नसल्याची माहिती नक्षलविरोधी मोहिमेचे विशेष महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी माध्यमांना दिली.


गस्त ठेवण्यासाठी किस्तराम येथून पलोडी येथे जाणार्‍या वाहनाला नक्षलवाद्यांनी लक्ष्य बनवले. अतिरिक्त दल घटनास्थळी पोहोचले असून सध्या गोळीबार सुरू नाही. असे अवस्थी यांनी सांगितले. किस्तराम येथून पलोडी येथे गस्तीवर जात असलेल्या भारतीय जवानांचे वाहन पूर्व दिशेला वळले. हे वळण नक्षलवाद्यांना अपेक्षित नव्हते. सर्व नक्षलवादी गणवेशात होते. प्रथमदर्शी गणवेशातील नक्षलवाद्यांना पाहून ते सीआरपीएफचे जवान असतील असे आपल्या जवानांना वाटले. परंतु काही मिनिटातच ते नक्षलवादी असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यातील काही काळी डंगरी घातलेले होते. सुरूवातीला आपल्या जवानांनी नक्षलवाद्यांवर यूबीजीएलचा मारा केला, परंतु तीन यूबीजीएलचा स्फोट झाला नाही. या तीन यूबीजीएलचा स्फोट झाला असता, तर आपल्यासाठी या भागातील ही सर्वात मोठी यशस्वी कामगिरी ठरली असती. आपल्या कोब्रा जवानांनी योग्य उत्तर देत 300 मीटरपर्यंत नक्षल्यांचा पाठलाग केला व स्फोटके, पेट्रोल बॉम्ब, टिफिन इत्यादी साहित्य जप्त केले.