आपल्या जातीला फायदेशिर ठरेल तेवढाच महापुरूष वापरावा, बाकीचा बहिष्कृत करावा !!
बहुजनांनो.... !
प्रत्येक सुज्ञ व्यक्ती वा तिची संघटना आपल्याला सोयिस्कर असा महापुरूष निवडतात व त्याच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांपैकी एखाद-दुसरासोयिस्करपणे स्वीकारतात. यात काही कालसंगत वा प्रस्तुतता असेल तर ते टिकते. काळाची गरज असेल तर त्याचे प्रमाण व संघटनही वाढत जाते.याच्या नेमके उलट करणारेही असतातच. महापुरूषांचे कालबाह्य झालेले अथवा जडण-घडणीतली पहिल्या टप्प्यांचा संदर्भ घेऊन दिशाभूल करणारीमांडणीही करतात. याचा अनुभव मला नुकतातच आला.
माझे मित्र प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांनी ‘सावित्रीमाई फुले विद्यापीठा’तील आणाभाऊ साठे अध्यासनच्या मदतीने ‘’जातीभेदमुक्त भारत’’ याविषयावर एकदिवशीय चर्चासत्र ठेवले होते. त्यात एका संशोधक प्राध्यापकाने बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील काही प्रबंधांचा संदर्भ देऊन मुद्दा मांडलाकी, बाबासाहेबांच्या मते युरोपचा विकास हा यहुदी-मुस्लीम-ख्रिश्चन धर्मातील संघर्षामुळे झाला. अरब देशांनी युरोपला चारही बाजूने घेरल्याने भारताचीनिर्यात थांबली. त्यामुळे हे देश स्वतःच निर्मिती करायला लागले व नंतर निर्यातही करू लागलेत. त्यामुळे युरोपची प्रगती झाली. त्यासाठी त्यांनीकोलंबसचेही उदाहरण दिले. आता हे मत बाबासाहेबांच्या प्रबंधात असले तरी त्यांनी ते तत्कालीन काही संशोधकांच्या संदर्भांवरून घेतले असणार.
मात्र युरोपचा अलिकडचा विकास हा केवळ रेनेसॉ मुव्हमेंटमुळे झालेला आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. अंधारयुगातून युरोपला बाहेरयेण्यासाठी फार कळा सोसाव्या लागल्यात. अनेक शास्त्रज्ञ व सुधारक मारले गेलेत. मात्र संशोधकांचं संशोधन जसजसे प्रत्यक्षात खरे उतरू लागले वत्यापासून मानवाला फायदेही मिळू लागले, तसतसे ते लोकमान्यही होऊ लागले. तेथे लवचिक वर्गव्यवस्था असल्याने नव्याला मान्यता मिळत गेली.त्यातून पुरोगामी व उदारमतवादी भांडवलशाही उदयास आली. खुद्द शासनकर्ता वर्गच या रेनेसॉ मुव्हमेंटचा लाभार्थी असल्याने, शासनस्तरावरूनच मोठ्याप्रमाणात प्रबोधनाची चळवळ फोफावली व जनमानसात रूजली. या प्रबोधनाच्या चळवळीने मानसांचा मेंदू चर्चच्या (धार्मिक) गुलामगिरीतून मोकळा केला.त्यातून विचारक्षमता वाढली व मेंदूत प्रश्न आकार घेऊ लागलेत? पृथ्वी गोल की सपाट? झाडावरचे फळ खालीच का येते, वर का जात नाही? ईश्वरआहे की नाही? वीज का कडाडते? असे असंख्य प्रश्न प्रबुध्द लोकांच्या डोक्यात घोंघावू लागलेत व त्यातून मोठमोठे शोध लागत गेलेत, यंत्रयुग सुरूझाले. उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढले. नवनवे निर्माण होऊ लागले. त्यातून अनेक देशांशी व्यापार सुरू झाला. आणी या सर्वांचा परिपाक म्हणजेयुरोपीय देश आज जगावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सत्ता गाजवित आहेत.
भारतातही ही प्रबोधनाची परंपरा आहे. ती प्राचिन व प्रदिर्घ आहे. चार्वाक, शंबुक, बुद्ध, संत, शिवाजी, फुले, आंबेडकर, कांशिराम ते व्हि.पीसिंगांपर्यंत! प्रत्येक युगात जेवढी प्रबोधनाची चळवळ झाली तेवढ्याच प्रमाणात लोकांना ‘विकास’ मिळत गेला. मात्र आपल्या देशात लवचिकवर्गव्यवस्थेऐवजी चिवट वर्ण व जातीव्यवस्था असल्याने नव्याचं स्वागत करतांना मेंदूची क्षमता कमी पडते. सर्वात कमी क्षमता असलेले मेंदू हेउच्चवर्णीय-उच्चजातीयांच्या डोक्यात असल्याने त्यांनी कायमच नव्याला कठोर विरोध केलेला आहे. जुनं कायम ठेवून नव्याचा फायदा होत असेल तर तेत्यांच्या वर्ण-जातीपुरतं स्वीकारतील. मात्र कनिष्ठ जातींना आवर्जून भिती घालतील की, हे जे काही ‘नवे’ येत आहे, त्याच्याने आपला धर्मभ्रष्ट होईल.आणी असं सांगणारे लोक धार्मिक-राजकीय सत्तेवर असल्याने त्यांनी प्रबोधनाची चळवळ जाणीवपुर्वक रोखली. एवढेच नव्हे तर, नवे येऊ घातलेले विचारगाडण्यासाठी जुन्या विचारांना पुन्हा पुन्हा नव्याने ‘फोडणी’ देऊन सादर केले जाऊ लागले. युरोपमध्ये प्रबोधन चळवळीतूनच नवा सत्ताधारीवर्ग आल्यानेसत्तेच्या साहाय्याने ही चळवळ फोफावली. भारतात असे झाले नाही. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की, संविधान कितीही पुरोगामी असले तरीते राबविणारे लोक जर जुन्या विचारांचे असतील तर, परिवर्तन अशक्य आहे. येथे सत्ताधारी केवळ जुन्या विचारांचे आहेत असे नाही तर, ते जुन्याविचारांचे लाभार्थीही आहेत. त्यालाच ते स्वतःचे ‘अस्तित्व’ मानतात. आणी हे अस्तित्व टिकविण्यासाठि ते कोणत्याही थराला जातात. चिवट व कर्मठजातीव्यवस्थेचं हे वैशिष्ट्यच आहे. छोट्या छोट्या व्यक्ती-गटांमध्ये जातीव्यवस्थेची भरभक्कम अशी वन-वे असलेली ‘सेमी-पारदर्शी’ भिंत असल्यानेविचार, संदेश, आदेश, हुकुम, शोषण हे एकाच बाजूने जाते, दुसर्या बाजूने नाही. जर दुसर्या बाजूने एखादे छिद्र पाडण्यात आले तर ते जिवाच्याआकांताने बुजविले जाते. उदाहरण देऊन स्पष्ट करतो-
सत्यशोधक चळवळीतून शुद्रादिअतिशुदातून एक मोठा प्रबुध्द वर्ग तयार झाला. या सत्यशोधक-प्रबुद्ध वर्गाला कुबुद्ध (ब्राह्मणी) लोक नष्ट नाहीकरू शकलेत. मात्र इंग्रजांकडून 1918 च्या मॉंटेंग्यु सुधारणा आल्याने काही जातींना सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा सर्व प्रथम ‘मराठालीग’ स्थापन झाली व त्यांनी या राजकीय सत्तेत ‘आरक्षण’ मागीतले. मात्र ‘‘कुणबट शुद्रांना असेंब्लीत काय नांगर हाकायचा आहे काय?’’ असा सज्जडदम टिळकांनी दिल्यामुळे मराठा जातीची पाचावर धारणच बसली. त्यांनी नाईलाजास्तव सत्यशोधक चळवळीचा आधार घेतला. आधार घेता घेताचळवळच बळकावली. तिचे क्रांतिकारक स्वरूप नष्ट करून तिला ‘ब्राह्मण-द्वेष्टी’ ब्राह्मणेतर चळवळ बनविली. आता ते केवळ जात न राहता एक‘संघर्ष-दल’ बनले होते व ब्राह्मणांशी पंगा घ्यायला ‘पात्र’ झाले होते. त्यांनी सत्यशोधक विचार खुंटीला टांगून ब्राह्मणांना शिव्या देऊन-देऊन आपली‘बार्गेनिंग’ ताकद वाढविली. ब्राह्मण हे संकटातही संधी शोधतात. ‘ब्राह्मणांना ही चांगलीच संधी मिळाली, आता ही सत्यशोधक चळवळ मरांठ्यांकडूनचगाडून घेता येईल’, असा दुरगामी विचार करून ब्राह्मण-मराठा युती झाली व अशाप्रकारे महाराष्ट्रात ‘मराठा-जात’ सत्ताधारी झाली. मराठा सत्तेवर येताचफुले-प्रणित शिव-उत्सव बंद पडला व शासकीय स्तरावरून ‘गणपती’ उत्सवाचे स्तोम माजले. प्रबोधनाची सत्यशोधक चळवळ मराठा-ब्राह्मण युतीनेठरवून नष्ट केली. जन्मदात्या आईला मारण्याची ‘’परशू’’ परंपरा ब्राह्मणांना फायदेशिर असते, कारण ते मुळातच पुरूषसत्ताक आहेत. पण बहुजनातमातूसत्ताक परंपरा असल्याने ‘जन्मदात्या’ आईला मारणे महा-पातक होय. त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच! ज्या सत्यशोधक चळवळी मुळेआपली मराठा जात सत्तेवर आली, त्या ‘जन्मदात्या’ आईचा खून त्यांनी मिळालेल्या सत्तेचा वापर करून केला.
सत्तेवर आल्यापासून गेल्या 60-70 वर्षात एकही सत्यशोधक संमेलन मराठा शिक्षण संस्थांमध्ये झालेले नाही. मात्र ब्राह्मणी मराठी साहित्यसंमेलनाचं निमंत्रण आपल्या मराठा संस्थेला मिळावं म्हणून कितीतरी संस्थाचालक ‘तडफड-तडफड’ करीत असतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.प्रबोधनाची चळवळ संपविण्यासाठी ब्राह्मणांकडून सर्व मार्ग वापरले जातात. प्रबोधनकार म्हणविणार्या ठाकरेंची चळवळ ठाकरे-पुत्राकडूनच संपविली गेलीआहे. आपण म्हणतो ‘सुर्यापोटी शनैश्चर’! पण असे म्हणणे बरोबर नाही. टिळक-पुत्र श्रीधरपंतांसारख्यांची मदत घेऊन आपणही टिळकप्रणित मनुवादीचळवळ संपवू शकलो असतो. पण ते आपल्या ध्यानीमनीही नाही व आपली ती क्षमताही नाही. कारण आपला मेंदू अजून जात-मुक्त झालेला नाही.महापुरूषांच्या जीवनातील फायदेशिर टप्पेच स्वीकारले जातात. ‘संविधानाचा टप्पा’ सर्वात जास्त ‘’व्यक्तिगत-जातीगत’’ फायद्याचा असल्याने आम्हीसंविधानावर खूप प्रेम करतो. मात्र ‘स्वतंत्र मजूर पक्षाचा’ टप्पा खराखुरा जातीअंतक असल्याने ‘’इतरांचा कशाल बघता, आपण आपल्या जातीपुरतंपहावं’’, असा विचार आपल्या मेंदूत ठाण मांडून बसला आहे. आपल्या जातीला फायदेशिर ठरेल तेवढाच महापुरूष वापरावा, बाकीचा बहिष्कृत करावा.
अर्थात हे सर्व घडले महापुरूषांची प्रबोधनाची चळवळ नष्ट झाल्याने! ती पुन्हा सुरू होण्याची वाट पाहू या व तो पर्यंत आपण एकमेकांना कडकडीत जयभीम-जयजोती करीत राहू या!
------- प्रा. श्रावण देवरे