Breaking News

देशाला सुवर्णपदक मिळवून देणारी ठरली सुवर्णकन्या!


प्रवरानगर प्रतिनिधी 

नेपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडो-नेपाळ शुटिंग बॉल टेस्ट सेरीजमध्ये दाढ ब्रुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका प्रकाश गाडेकर हिने ‘नेटमन’ची भूमिका पार पाडतांना नेत्रदीपक खेळ करत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. भारतीय संघात सर्वात कमी वय असलेली महिला खेळाडू म्हणून तिने सर्वांचे ध्यान आकर्षित केले आहे. ग्रामीण भागात राहत असलेली ऋतिका देशात सुवर्णकन्या ठरली असून यानिमित्ताने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

लोणी येथे मार्च महिन्यात पार पडलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेमधून भारताच्या महिला व पुरुष संघाची निवड करण्यात आली होती. यातील महिलांच्या संघामध्ये ऋतिकाचा समावेश करण्यात आला होता. अखिल भारतीय शुटिंग बॉल फेडरेशनचे अध्यक्ष मनोज सुळे, सेक्रेटरी रवींद्र तोमर, एशियन शूटिंग बॉल असोशियशनचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, भारतीय शूटिंग बॉल असोशियशन सदस्य विषाणू निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तिची निवड करण्यात आली होती. हरियाणाचे बलवान सिंग यांनी टीमचे कोच म्हणून तर गोव्याचे सुनील गावडे आणि महाराष्ट्राचे डॉ. सुनील बुलार यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. ऋतिकाला महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ पन्हाळे आणि क्रीडाशिक्षक दादासाहेब तुपे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष देवीचंद तांबे, कारखान्याचे संचालक अशोक गाडेकर, प्रतापराव तांबे, सरपंच पुनम तांबे आदींसह ग्रामस्थांनी ऋतिकाचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.