Breaking News

वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर तहसीलदारांनी केला जप्त नैसर्गिक संपत्तीवर दरोडा सुरूच



राहुरी विशेष प्रतिनिधी.

तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन वाळू वाहतूक सुरुच आहे. तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासह महसूल पथकाने कारवाई करत वाळूचा ट्रॅक्टर तहसीलचा आवारात लावला.

राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातील चोरटी वाळू वाहतूक तस्कराकडून थांबता थांबत नाही. महसूल व पोलिस प्रशासनानेही या वाळूतस्करांसमोर नांग्या टाकल्याचे चित्र समोर येत आहे. कोट्यावधी रुपयांच्या शासकीय मालमत्तेवर वाळूमाफिया दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत. यामधे काही महसूलचे तर काही खाकीवर्दीवाल्यांचेही हात बरबटलेले आहेत.

राहुरीचे तहसीलदार दौंडे, ब्राम्हणीचे मंडलाधिकारी देशमुख, वळणचेह तलाठी बाचकर, मानोरीचे तलाठी थोरात, वळणचे कोतवाल खुळे, पिंप्री वळणचे कोतवाल साळवे यांनी सदरची कारवाई केली. पहाटेदरम्यान तहसिलदार यांच्यासह मुळानदीपात्रालगतच्या गावात हे पथक दबा धरण बसले होते. या भागातील वळण, मानोरी, तांदूळवाडी येथील मुळानदीपातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. त्यामुळे तहसीलदार अनिल दौंडे यांनी महसूलचे कर्मचारी बरोबर घेत या भागातील मुळापात्रात वाळू तस्करांची शोध मोहिम सुरु केली. यावेळी एक ट्रॅक्टर चोरुन वाळू घेऊन जातांना महसुल पथकाला दिसला. मात्र सदर ट्रॅक्टरचालकाने तो सुसाट वेगाने नेऊन अंधारात एका वस्तीवर लावून चालक पसार झाला. ट्रॅक्टरचा शोध घेत असतांना सदरचा ट्रॅक्टर महसूल पथकाला दिसताच त्याठिकाणाहून तो ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, तो ट्रॅक्टर दत्तू आढाव याचा असल्याचे समजले. 

या भागातून रात्रंदिवसा वाळूतस्करी सुरु आहे. महसूल पथकाचेही या तस्करासमोर हात टेकल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. दोन वर्षांत राहुरी महसूलची कारवाई समाधानकराक असली तरी वाळूमाफियांनी आपले जाळे ‘वर’पर्यंत असल्याकारणाने काही वेळेला स्थानिक महसूल विभागावर कारवाई करण्यावर मर्यादा आल्या आहेत. वाळूतस्कर महसुल विभागाच्या पथकावरही हल्ले करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. 

चौकट

वाळूतस्करांची आयकर चौकशी व्हावी

राहुरी तालुका हा वाळु माफियांचे आगार समजले जात आहे. या तालुक्यात दोन नद्याचा उगम असल्याने अनेक छोटे मोठे वाळूतस्कर येथे उदयास आले आहेत. या तस्करांनी शासनाची वाळू चोरी करुन मोठी ‘माया’ गोळा केली आहे. तालुक्यात वाळूतस्करीतून अनेक रक्तरंजित घटना घडल्या आहेत. याला कोण लगाम घालणार, असा सवाल उपस्थित झाला असून आयकर विभागाने या वाळूतस्करांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.