Breaking News

सैन्यात भरतीचे आमिष दाखविणारा राजकुमार काटकर गजाआड


सातारा - भारतीय सैन्यदलामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणारा कुकुडवाड, ता. माण येथील राजकुमार बजरंग काटकर याला कोरेगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात बोरजाईवाडी येथील राजेंद्र कदम यांनी तक्रार नोंदविली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 
राजकुमार काटकर हा दहिवडी येथे महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमी चालवत होता. ओळखी काढून, सैन्यदलात भरती करण्याचे आश्‍वासन देऊन त्याने अनेकांना फसवून मोठमोठी रक्कम उचलली आहे. त्याच्या विरोधात जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याला सैन्यदलात भरती करण्याचे आश्‍वासन काटकर याने दिले होते. त्याबदल्यात त्याने चार लाख रुपये उचलले होते. पैशांसाठी तगादा लावल्यानंतर त्याने निरंजन याला सिकंदराबाद (तेलंगणा राज्य) येथे एका अनोळखी व्यक्तीकडे नेले होते. त्यानंतर कॉल लेटर येईल, असे सांगून फसवणूक केली होती. काटकर याच्या विरोधात गुन्हे दाखल होत असल्याचे पाहून राजेंद्र कदम यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार काटकर याला ताब्यात घेऊन अटक केली.