भाजप शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्यासह 50 जणांवर गुन्हा
सोलापूर - बलिदान चौक ते विकासनगर, होटगी रस्ता या मार्गावर विनापरवाना दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या रॅलीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी हेही सहभागी झाले होते. हवालदार अमित रावडे यांनी जोडभावी पोलिसात तक्रार दिली आहे. निंबर्गी यांच्यासह नगरसेवक नागेश वल्याळ, अविनाश महागावकर, दत्तात्रय गणपा, वृषाली चालुक्य यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भाजप पक्षाकडून बलिदान चौक ते होटगी रोड महावीर चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही. तसेच जमावबंदीचे आदेश असताना जमाव जमवून आदेश मोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फौजदार सानप तपास करीत आहेत.
