Breaking News

टाटाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेत 6200 कोटींचा दंड

वॉशिंग्टन, दि. 17 -  टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने 94 कोटी डॉलरचा (6200 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट‘ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल लागला आहे.
टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसान भरपाई व 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश विस्कॉन्सिन राज्यातील ग्रँड ज्युरीने दिला आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीसीएसच्या कर्मचार्‍यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टम्सने म्हटले होते.