Breaking News

दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपींना मिळते मटनाचे जेवण


जामखेड / शहर प्रतिनिधी । 
संपूर्ण नगर जिल्ह्याला हादरुन सोडणार्‍या जामखेड येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपींना, पोलिसांच्या आशिर्वादाने दररोज चिकण व मटनाचे जेवण पुरविले जाते. याबाबत हत्याकांडात मृत्यू झालेल्या नातेवाईकांनी दि. 28 रोजी रात्री 10.30 वाजता आरोपींना मांसाहारी जेवणाचे डबे देत असताना रंगेहाथ पकडले, यामुळे जामखेड जेलमध्ये आरोपींना सर्व सुविधा मिळत असल्याचे उघड झाले. हा प्रकार जेलप्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 
दि. 28 एप्रिल रोजी जामखेड शहरात बीड रोडवर दुहेरी हत्याकांड घडवून आणलेले मुख्य आरोपी सध्या जामखेड येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आरोपीप्रमाणे वागणूक न मिळता सर्व सुविधा व बाहेरचे जेवण दिले जाते. हे सर्व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने होत आहे. याबाबत फीर्यादीने यापूर्वीच लेखी तक्रार विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार यांनी दखल घेत जेलप्रमुखांना पत्र देत ताकीद दिली होती, मात्र जेलरने दखल घेतली नाही.
दि. 28 जून रोजी जेलमधील आरोपींना जेवण घेऊन जाणार्‍याला जेलच्या गेटवरच पकडले असता, त्याच्याजवळ जेवणाच्या डब्यात सुक्के उकडलेले मटन व रस्स्याने भरलेल्या किटल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच 
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने जेलकडे पाचारण केले. सदर घटनेचा माहिती घेतली. हा सर्व प्रकार कैद्यांना जेवण देणारा ठेकेदार व संबंधित पोलिस यांच्या सहमतीनेच घडत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आढळून आलेले मांसाहारी पदार्थ व इतर बाबींचा पंचनामा करण्यास सांगितले. 
कैद्यांना जेलमध्ये अशा प्रकारच्या मिळणार्‍या सुविधा व नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी बाबत पोलिस निरीक्षक व जेलप्रमुखांना अहवाल मागितला आहे. यात आढळून आलेल्या दोषींवर कडक कारवाई करणार असे तहसीलदार यांनी सांगितले.

दुहेरी हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सर्व सुविधा व रोज मटणाचे जेवण मिळते. रंगेहाथ पकडलेल्या मांसाहारी जेवनाचा पंचनामा तहसीलदारांनी जेलरला लिहिण्यास सांगितला जेलरने चूकीचा लिहिलेला पंचनामा संतप्त झालेल्या, नगरसेवक अमित जाधव यांनी फाडला व खरा पंचनामा लिहिण्यास भाग पाडले. जामखेड जेलमध्ये इतरही अनेक आरोपींना खाजगी जेवन, मोबाईल कपडयांसह सर्व सुखदायी सुविधा पोलिसांच्या आशिर्वादाने दररोज मिळत असल्याचा आरोप संतप्त नातेवाईक व नागरिक करत आहेत. सदर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी व आरोपींना दुसरया जेलमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी फिर्यादी कृष्णा राळेभात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.