Breaking News

आज भारतीय जनसंसदच्या वतीने आंदोलन



अहमदनगर/प्रतिनिधी।
दूधाला भाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने तर पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणार्‍या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मंगळवार दि.5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध जिल्हाधिकार्‍यामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतकर्‍यांच्या शेत मालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यात जोडधंदा असलेल्या दूधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात निर्सगाने दिलेल्या दगाफटक्याने अधिक भर पडल्याने शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येचा मार्ग स्विकारत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने पाकिस्तानची साखर आयात केल्याने देशातील साखरेचे भाव गडगडले आहे. देशातील तूर सरकारने घेतले नाही. मात्र मोझांबिक देशातून तूर घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर शेतकर्यांच्या दूधाला कमी भाव मिळत असून, एका लीटरचे तीन लीटर भेसळयुक्त दूध बनविण्याचे पाप डेअरी व दूधसंघ करीत आहे. याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. शेतकरी दूधाच्या भावासाठी उभे केलेले आंदोलन रास्त असून, सरकारचे निषेध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध पाठविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. या आंदोलनात अ‍ॅड.गवळी, अशोक सब्बन, कॉ.बाबा आरगडे, अशोक वाकचौरे, सुधीर भद्रे, कैलास पटारे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात आदि सहभागी होणार आहे.