Breaking News

शेतकर्‍यावरचं संकट दरवर्षाचं

तालुका वार्तापञ सुभाष माळवे कर्जत 


तालुक्यात यावर्षी कपाशीच्या पिकांवर पडलेल्या बोंडअळीचे संकट व फळबागांसाठी मिळणारे अनुदान बंद झाल्याने पीक लागवडीखालील क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. तर शेतकर्‍यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभागही आखणी करत आहे.
वाढते तापमान, वातावरणातील बदल, घटत जाणारी पाण्याची पातळी, बियाणांचा दर्जा, मजुरांचा अभाव, शेतमालांचे पडलेले भाव आदी कारणांमुळे शेती ही शेतकर्‍यांना परवडेनाशी झाली आहे. मात्र शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने शेतीशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती मात्र शेतकर्‍याची झाली आहे. मग ती तोट्यामध्ये का असेना!
दरवर्षी पाऊस पडला की, शेतकरी पेरणीची तयारी करतो. त्याचा काळ्या आईवर प्रचंड विश्‍वास ंआहे. निदान यावर्षी तरी भरघोस पीक येईल, हाती पैसा खुळखुळेल हा आशावाद असतो. मागील वर्षी तर शेतीत काहीच उरले नाही, नगद मिळवून देणार्‍या कपाशीच्या पिकाला बोंडअळीने घेरले. उत्पन्नात मोठी घट ंझाली. शेवटच्या टप्प्यात दरवर्षी शेतकरी कपाशीला पाणी देऊन मशागत करून पुन्हा कपाशीचे उत्पन्न घेतात. मात्र बोंडअळीने ही कपाशी फस्त केली. शेतातील पळाटी ही कृषी विभागाच्या आवाहनानुसार 31 मार्च अखेर उपटून फेकावी लागली, भावही मिळाला नाही. आजही भाव वाढेल या आशेने बर्‍याच शेतकर्‍यांच्या घरात कापुस पडलेला आहे. सोयाबीनची अशीच परिस्थिती आहे. कारख्यान्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात झपाटयाने वाढ होत आहे. गहू व हरभरा या पिकालाही घटलेल्या पाणीपातळी व विजेच्या अडचणीमुळे मोठा फटका बसला. मोसंबीचे क्षेत्र नामशेष होताना दिसून येत आहे. इतर फळबागांचीही अशीच अवस्था आहे. कारण फळबागा वाचविण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर एकवटला असल्याचे दिसून येत आहे.


चौकट 
या संदर्भात तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले की, यावर्षी कपाशीचे क्षेत्र घटून, मूग, सोयाबीन, उडीद या पिकात वाढ होईल.
शेतकर्‍यांनी कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनासाठी संपर्कात राहावे, योग्य पिकांचे नियोजन करून खात्रीचे बियाणे निवडण्याचे आवाहनही सुपेकर यांनी केले.


चैाकट 
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकर्‍यांना प्रशिक्षण 25 मे ते 7 जून दरम्यान होत आहे. यात सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर, मृदा चाचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.