Breaking News

अन एका महिलेचा वाचला जीव अकोले तालुक्याला वादळी वार्‍याचा तडाखा

अकोले / प्रतिनिधी । तालुक्याला वादळी वार्‍याचा जोरदार तडाखा बसला आहे. या वादळी वार्‍यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक महिला या वादळी वार्‍याच्या तडाख्यातून वाचल्या आहेत.


शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अकोले तालुक्यातील आढला, मुळा, प्रवरा या विभागात मान्सूनपुर्व पावसाने सर्वदूर हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळी वारा जास्त, अशी परिस्थिती नागरिकांना अनुभवयास मिळाली. अकोले शहरातील देवठाण रोडच्या कडेला राहणार्‍या सुनंदा शेटे या वृद्ध महिलेच्या घरासमोर मोठी झाडे असून ती झाडे आता वृद्ध झाली आहेत. याखेरीज या झाडांच्या फांद्यांमधूनच विजवाहक तारा गेलेल्या आहेत. कालच्या अवकाळी पावसामुळे या तारा सुनंदा भाटे या महिलेच्या घरावर कोसळल्या. दैव बलवत्तर म्हणून वीज पुरवठा खंडित झालेला होता, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सुनंदा भाटे या वृद्ध महिला एकट्याच राहत आहेत. त्यांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले, सुदैवाने त्यामुळे काही हाणी झाली नाही, अन्यथा रस्त्यावर मोठा अपघात घडला असता. सुनंदा भाटे या महिलेने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा लेखी पत्र पाठवून घरासमोरील जीर्ण झाडे काढण्यास सांगितली आहेत. मात्र प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे ही झाडे अजून तशीच उभी आहेत. या झाडांची वयोमर्यादा जास्त झाल्यामुळे या झाडांच्या फांद्या वादळी वार्‍यामुळे रस्त्यावर मोडून पडतात. यंदा कदाचित अजून मोठा वादळी वारा झाला तर हे मोठे झाड थेट सुनंदा भाटे या महिलेच्या घरावर पडून घर जमीनदोस्त होऊ शकते. गाफील प्रशासनाने तात्काळ हे झाड काढण्याची गरज आहे. तसेच विद्युत वीज वितरण कंपनीने विजवाहक तारा दुसर्‍या बाजूने नेण्याची गरज आहे. या वादळी वार्‍यामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावरील लोहटेवस्ती नजीक अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. याखेरीज इंदोरी येथील शिवनगर भागातील सावळेराम नवले यांच्या मालकीच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेले.त्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नूकसान झाल्याची माहिती डॉ. गणेश नवले यांनी दिली. या वादळी वार्‍याचा प्रामुख्याने तडाखा प्रवरा खोर्‍यातील गावांना बसला आहे. याखेरीज शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, पिके भुईसपाट झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.