Breaking News

विकासकामांचे आज होणार लोकार्पण


राहुरी तालुका प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथील अण्‍णासाहेब कदम यांच्‍या पुर्णाकृती पुतळयाच्‍या परिसरात सुशोभिकरण, देवळाली प्रवरा सोसायटीचे प्रवेशद्वार, लोकसहभागातून देवळाली प्रवरा शहरातील ओढे-नाले रुंदीकरण, खोलीकरण आदी कामांचा लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी { दि. २९ } सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्‍यात आला आहे, अशी माहिती राजश्री कदम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जगदीश कदम यांनी दिली.

ते म्‍हणाले, देवळाली प्रवरा येथे राजश्री कदम प्रतिष्‍ठानच्‍यावतीने अण्‍णासाहेब कदम पुतळा परिसर सुशोभिकरण मोठया शहराच्‍या धर्तीनुसार करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे राजश्री कदम प्रतिष्‍ठानवतीने देवळाली प्रवरा शहरासाठी पोकलेन मशिन भेट म्‍हणून देण्‍यात आले होते. या मशिनच्‍या सहाय्याने व लोकसहभागातून शहरातील ओढे रुंदीकरण व खोलीकरण कामाचा लोकार्पण व ओढया-नाल्‍यांवर वृक्षारोपण करण्यात आले. देवळाली प्रवरा सोसायटीच्या शताब्‍दी वर्षानिमित्त अण्‍णासाहेब कदम यांच्‍या स्‍मृतिप्रित्‍यर्थ प्रवेशद्वार उभारण्‍यात आले आहे. या प्रवेशद्वाराचा व विविध कामांचा लोकार्पण सोहळा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्या जोशी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे कार्यक्रमाच्या अध्‍यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. 

यावेळी आदर्श गाव संकल्‍प व प्रकल्‍प समिती महाराष्‍ट्र राज्‍याचे कार्याध्‍यक्ष पोपटराव पवार, पश्चिम महाराष्‍ट्र प्रांतचे संघचालक नाना जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम आणि देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमन शहाजी कदम यांनी केले आहे.