बहुजन क्रांती मोर्चाचे ३० जून रोजी धरणे
राहुरी प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यभर ३६ जिल्हे, ३६७ तालुके यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांच्या मुख्यालयावर दि. ३० जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चा राहुरी तालुका संयोजक संजय संसारे यांनी दिली.
संसारे म्हणाले, बहुजन क्रांती मोर्चा हे बहुजन समाजातील सामाजिक समूहांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, बलुतेदार, धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, लिंगायत, बौद्ध, जैन आदींना सोबत घेऊन कार्य करणारे संघटन आहे. बहुजन समाजावरील होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात सातत्याने संघर्ष करत आहे. वाकडी तालुका जामनेर जि. जळगाव येथील विहिरीत आंघोळ केल्याने पाणी बाटले म्हणून त्या तरुणांची नग्न धिंड काढली.
बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवा, महिला आदींनी या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात एकीची वज्रमूठ उगारून संघर्षासाठी तन-मन-धनाने सहयोग द्यावा, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा राहुरी तालुका संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.