Breaking News

शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु



पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी शिवारातून जाणार्या पैठण-पंढरपुर पालखी मार्गाची केलेली मोजणीचा सर्व्हे चुकीचा व अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ मिडसांगवीच्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करुन, या मार्गाचा फेरसर्व्हे करण्याची मागणी केली.

पैठण-पंढरपुर पालखी मार्ग मिडसांगवी शिवारातून जातो. या मार्गाची मोजणी करण्यात आली असून, याद्वारे शेतकर्यांच्या जमीनी संपादित होणार आहे. मात्र सदरचा सर्व्हे चुकीचा व शेतकर्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत या मार्गाचा फेरसर्व्हे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
पालखी मार्गाचा सर्व्हे दि.16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 या काळावधीत झाला होता. त्याचा अहवाल तयार करुन तो प्रांताधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला. त्या अहवालानुसार नोटीसा मिळाल्या. भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या मोजणीमध्ये अनेक त्रुटी आहेत. काही चुका जाणीवपुर्वक करण्यात आल्या आहेत. तांत्रिक चुकीमुळे अनेक शेतकर्यांचे नाहक शेतजमीनीचे क्षेत्र संपादित होणार आहे. मोजणी करताना काही ठिकाणी नवा रस्ता तर काही ठिकाणी जुना रस्ता ग्राह्य धरण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. इंग्रज काळीन नकाशा आणि जुने गाव नकाशा समोर ठेवून प्रशासनाने सर्व्हे करावा. अशी शेतकर्यांची मागणी आहे. याबाबत प्रत्यक्ष पहाणी करुन चुका दुरुस्त करण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी दिला आहे. मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. पैठण-पंढरपुर पालखी मार्ग हा मिडसांगवीचे बसस्थानक हे पाचशे मिटर अंतराच्या आत असणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाने ते दीड ते दोन हजार मीटर एवढा लांब अंतरावर नियोजन केले आहे. त्यामुळे वृध्द, महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणार आहे. गाव ते बसस्थानक पाचशे मीटरच्या आत असावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत उचीत कार्यवाही न झाल्याने मिडसांगवीच्या शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले आहे.