अनेक वर्षांपासून कामगारांची पिळवणूक होत होती. परंतु कामगारांच्या एकजुटीने व वर्षानुवर्षे लढा देऊन कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी संघर्ष केला. या संषर्घाचे फलित म्हणजे कामगारांसाठी माथाडी कामगार कायदा लागू झाला आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळू लागले. त्यामुळेच अंगमेहनती कष्टकर्यांना भविष्य निर्वाह निधी, उपदान, विमा, बोनस, आरोग्यसेवा इत्यादी हक्क म्हणून मिळत आहेत. अशा चांगल्या कायद्याची अंमलबजावनी देशातील सर्व असंघटीत व सुरक्षित कष्टकर्यांना लागू व्हावी अशी अपेक्षा आहे. आज माथाडी कायदा लागू होऊन आज 49 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर माथडी कामगारांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
नगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पहिला पगार घेणार्या ज्येष्ठ कामगारांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, गोविंद सांगळे, मधुकर केकान, शेख रज्जाक शेख लाल, लक्ष्मीबाई कानडे, बाळासाहेब वडागळे, भैरवनाथ कोतकर, बबन अजबे, सतीश शेळके, सचिन ठुबे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी कॉ.बाबा आरगडे म्हणाले, महाराष्ट्रातील माथाडी कामगारांसाठीचा हा कायदा आता केंद्रीय स्तरावर गेला असून, नुकतीच केंद्रीय कायदा मंत्री यांनी महाराष्ट्रातील माथाडी कायद्याचे देशातील इतर राज्यांनीही लागू करुन कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे.