एका पोलिसासह पाच पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू
पणजी/वृत्तसंस्था : अकोल्याच्या पाच पर्यटकांचा गोव्याच्या कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या विठ्ठलनगरहून 14 पर्यटकांचा एक गट आज सकाळी कळंगुट समुद्रात आंघोळीसाठी उतरला होता. खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नसल्याने त्यातले पाच जण समुद्रात ओढले गेले. पाण्याचा प्रवाह आणि लाटा इतक्या मोठ्या होत्या की त्यांना बाहेर काढणं शक्यच झालं नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यातल्या तीन मृतदेहांचा शोध लागला असून उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे. मृत्यू झालेल्या तिघात दोन सख्खे भाऊ आहेत. वारंवार सुचना आणि सर्तकतेचा इशारा देऊन पाण्याच्या जवळ जाण्याचं धाडसं पर्यटक करतात आणि तिथेच त्यांच्या जीवाशी खेळ होतो. मृत व्यक्तीमध्ये प्रितेश गवळी, वय 32 वर्षे, चेतन गवळी, वय 27, उज्जल प्रकाश वकोद, वय 25 वर्षे, किरण ओमप्रकाश म्हस्के आणि शुभम गजानन वैद्य यांचा समावेश आहे. दरम्यान, खालील दोघांचे मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. स्थानिकांच्या आणि शोध पथकाच्या मदतीने शोधकार्य अद्याप सुरू आहे.
