Breaking News

मुळा मातेच्या मंदिराचे आ. वैभव पिचड यांच्या हस्ते भूमिपुजन

अकोले तालुक्यातील मुळा विभागाला वरदान ठरलेले, पिंपळगाव खांड धरणाच्या ठिकाणी स्व. जितेंद्र पिचड यांच्या स्मरणार्थ एक प्रेरणादायी आठवण म्हणुन मुळा माता मंदिराच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम अकोले तालुक्याचे आ. वैभव पिचड आणि त्यांच्या मातोश्री हेमलता पिचड यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती.पिंपळगावखांड धरणग्रस्त शांताराम साबळे, रमेश देशमुख, संजय देशमुख हे मंदिराच्या भूमपुजनास बसले होते. पिंपळगावखांड धरणामुळे अकोले तालुक्यातील मुळा विभागाचे भाग्य पलटल्याचे गौरवोद्गार वैभव पिचड यांनी काढले. मुळा नदी खळखळ वाहते प्रचंड वेग नदिला आहे. या नदिवर मुळा डॅम मोठे धरण भरते. परंतु ज्या तालुक्यातुन या नदिचा उगम होतो, त्या भागाला पाणी मिळत नव्हते. म्हणुन या धरणामुळे आता शाश्‍वत पाणी मुळा विभागाला उपलब्ध झाले असुन, हा परिसर जिवंत झाल्याचा आनंद जास्त असल्याचे वैभव पिचड यांनी सांगितले. पिंपळगाव खांड धरणासाठी अमुल्य असे योगदान धरणग्रस्तांचे आहे. ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्या शेतकर्‍यांच्या त्या भागावर हे धरण उभे असुन, त्यांना वाढीव मोबदला जास्त मिळाला पाहिजे अशी अपेक्षा वैभव पिचड यांनी व्यक्त केली. धरण बांधण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या अडचणी होत्या परंतु तालुक्याचे भाग्यविधाते मधुकर पिचड यांनी संघर्ष करून मोठ्या जिद्दीने अशक्यप्राय असे वाटणारे धरण पुर्णत्वास नेले, याचे सर्व श्रेय अजित पवार यांना जात असल्याचे आ. वैभव पिचड यांनी सांगितले. मुळा विभाग कायम दुष्काळी भाग म्हणुन पाहिले जायचे परंतु आता शेतीला शाश्‍वत चोविस तास पाणी उपलब्ध झाल्याने येथील शेतकरी स्वावलंबी झाला आहे, तो कष्ट करून चांगले पिक घेऊन आपल्या कुटुंबाची प्रगती नक्किच साधु शकेल असा विश्‍वास वैभव पिचड यांनी व्यक्त केला. या धरणाचा फायदा फक्त मुळा विभागाला नसुन पठार भागातील अनेक गावांनादेखील होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचालन सयाजीराव पोखरकर यांनी केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सिताराम देशमुख, सभापती भरत देशमाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, मधुकर नवले, अशोक देशमुख, सुधाकर देशमुख, जि. प. सदस्य रमेश देशमुख, चंद्रकांत घुले, गोरख मालुंजकर, सुधाकर देशमुख, पाटबंधारे विभागाचे खर्डे आरोटे आणि देशमुख आधिकारी उपस्थित होते.