Breaking News

अग्रलेख - शेतकर्‍यांप्रती सरकारची अनास्था !


शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उचलल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. मात्र सरकारची नेहमीचीच अनास्था शेतकरी धोरणांप्रती मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक आज कृृषी क्षेत्राला संपूर्णत: कलाटणी देण्यासाठी ध्येयधोरणात आमूलाग्र बदल करण्याची खरी गरज आहे. कृषी क्षेत्राशी संबधित बी-बियाणे, खते औषधी याच्या किमती कमी कशा करता येईल, शेतकर्‍यांना प्रगल्भ करून, रासायनिक खते वापरण्याचे दुष्परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम, औषधीचे देखील दुष्परिणाम या सर्व बाबी शेतकर्‍यांच्या मनांवर चांगल्या रीतिने बिंबवाव्या लागतील. तरच भविष्यात शेतकरी उभा राहू शकेल. कारण शेती धोरणात बदल केला नाही, तर शेतकरी आणि शेती दोन्ही उजाड होण्याची भीती आहे. येणार्‍या काळात समस्यांमध्ये वाढच होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती करणे बिकट होणार असून, शेतकर्‍यांना जगणे कठीण होणार आहे. 
देशात आजमितीस लोकसंख्येचा वेग वाढतो आहे, मात्र रोजगाराचा वेग हा सातत्याने मंदावतो आहे, कर्जबाजारी अवस्था, आणि अनियमित पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील वर्ग हा शहराकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीत रोजगांराची समस्या ही गंभीर झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी नसल्यामुळे उद्योगधंद्यांचे उत्पादन काहीसे मंदावले आहे, त्याचाही परिणाम रोजगांरावर होतांना दिसून येत आहे. कर्जबारातीपणामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे. प्रामुख्याने विचार केल्यास शेतकरी आत्महत्या होणार्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त पीक उत्पादनावरच अवलंबून आहे, असे निदर्शनास येते. त्या घरातील व्यक्तीला शेतीसोबतच कोणताही जोडधंदा नसल्यामुळे, पुरेसा पाऊस पडला नाही तर, कुटुबांचे उत्पन्न थांबते, परिणामी चार पैसे मिळवण्यासाठी कोणताही मार्ग हातात नसतो, त्यामुळे आत्महत्या करण्याची मानसिकता त्याची तयार होत जाते. आज देशातील 60-65 टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार असूनही आजची पिढी शेतीत काम करायला तयार नाही. कारण आजचा तरुण शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांची तुलना करू लागला आहे.शहरी भागाच्या मानाने ग्रामीण भागात अत्यंत अल्प प्रमाणात सोयी-सुविधा आहेत. शेती व्यवसाय कष्टाचा, अनेक संकटांमधून चालणारा अशाश्‍वत व्यवसाय आहे. लहरी हवामान, वर्षोनुवर्षे पडणारा दुष्काळ, सरकारचे उदासिन धोरण, शेतकरी धोरणावर उपाययोजना करण्यात अपयशी, यामुळे ग्रामीण भागातील मोठा वर्ग यहराकडे स्थलातंरित होतांना दिसत आहे. आपल्याकडे होणारा पाऊस त्यामानाने चांगला आहे, मात्र त्याचे नियोजन आपण करत नाही, चार महिने पडणार्‍या पावसाची आपण जर योग्यरित्या त्याचे साठवण, पुर्नभरणा केला तर वर्षभर पाणीसमस्या जाणवणार नाही, मात्र त्याकडे आपण सातत्याने दुर्लक्षच केले आहे, प रिणामी दुष्काळ, आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या सारख्या समस्या उभ्या राहतात. ग्रामीण भागामध्ये युवकांना आकर्षित करून शेतीमध्ये त्यांनी त्यांचे करिअर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. कौशल्यावर आधारित कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगार निर्मितीसाठी योग्य ते सहकार्य करावे लागेल. यासाठी शासकीय पातळीवर उदासीन धोरण दिसून येते. शेतकरी स्वावलंबी न बनवता, त्याला तुटपुंजे अनुदान देऊन, त्याची बोळवण केली जाते. त्यामुळे दुष्काळ, गारपीट, बोंडअळी या संकटामुळे तो लगेच कोलमोडून पडतो. त्यासाठी सर्वप्रथम शेतकर्‍यांना उभे करण्याची, त्यांना लघूउद्योगांना प्रेरित करून त्यांचा विकास करण्यासाठी सर्व सोयी सुविधा देण्याची खरी गरज आहे.