Breaking News

जहन्नुम (नरक)पासून मुक्तीचा कालावधी

रमजान महिन्याच्या शेवटच्या खंडास आजपासून प्रारंभ होत आहे. हा कालावधी जहन्नुम पासून आजादी, अर्थात नरकापासून मुक्ततेचा काळ म्हणून गणला जातो. या कालावधीत अल्लाहतआला लाखो लोकांची जहन्नुममधून मुक्तता करतात. या दहा दिवसांच्या काळातील विषम तारखांच्या पाच रात्री या लैलतुलकद्र किंवा शब-ए-कद्र म्हणूनच्या रात्री म्हणून मानल्या जातात. या पाचपैकी एक रात्रही शब-ए-कद्र आहे. तिचा प्रत्येकाने शोध घेण्याची आवश्यकता आहे.

अल्लाहतआलाने सृष्टी निर्माण करताना अनेक आश्‍चर्य निर्माण करून ठेवली आहेत. एकातून अनेक रुप निर्माण केले आहेत. साधे उदाहरण घ्या पाण्याची अनेक रुपे पहा. पाणी वर आकाशात गेल्यास वाफ, आकाशातून बरसल्यास पाऊस जोरदार आल्यास गारा, थंडीने गोठल्यास बर्फ, फुलांच्या पाकळ्यांवर असल्यास दव, पानातून काढल्यास अर्क, साचल्यास तळे व वाहते झाल्यास नदी अशी विविध रुपे धारण करतो. पाणी हा आपला व प्रत्येक सजवाचा आवश्यक भाग आहे. त्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात ज्या वेळी पाणीटंचाई जाणवते. तेव्हा त्याचे महत्त्व कळून येते. आता मात्र जेवढे पाणी येत आहे. तेवढे वाहून जात आहे. जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्याची नितांत आवश्यकता आहे.
प्रेषित हजरत पैगंबर (स.) यांनी पाण्याबाबत म्हटले की, पाण्याचा वापर काटकसरीने करा, त्याचाही हिशोब अल्लाहला द्यावा लागणार आहे. पाणी पिताना बसून प्यावे, पाहून प्यावे व तीन श्‍वासात पणी प्यावे, अशीही शिकवण दिली आहे. शहरात मुबलक पाणीपुरवठ्या हजारो लिटर पाणी दररोज गटारात वाहून जाते. याकडे कोणाचेच लक्ष नाही. ही पाण्याची उधळपट्टी थांबविण्याचा आवश्यकता आहे.
जगाच्या विनाशाचे एक लक्षण अजून आहे ते म्हणजे रात्रंदिवसाची बरकत काढून घेतली जातील. वर्ष महिन्यासारखे, महिने आठवड्यासारखे, आठवडे दिवसासारखे, दिवस तासा समान व तास मिनिटांप्रमाणे निघून जातील, असे म्हटले आहे. तो अनुभव सध्या आपण घेत आहोत. रमजानचे 20 दिवस कसे निघून गेले ते कळालेदेखील नाही. उरलेले 10 दिवसही असेच निघून जातील. तेव्हा उर्वरित संधीचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आता ईदची खरेदीही जोरात व अंतिम टप्प्यात आहे. ही खरेदी करताना समाजातील गोरगरीब अनाथ-गरजू घटकांकडेही लक्ष असू द्यावे. आपली ऐपत असूनही आपल्याकडून आपल्या शेजारचा एखादा गरजू, अनाथ, विधवा, दुर्लक्षित राहिल्यास त्याचा जाब अल्लाहला द्यावा लागेल ही जाणीव ठेवून खरेदी करताना अशा घटकांसाठीही खरेदी करावी. शेवटी एकमेकांची सुखःदुःखे वाटून घेण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, हे विसरता कामा नये. अल्लाह सर्वांनाच सुबुद्धी देवो. (आमीन)


प्रासंगिक 
आबीद दुलेखान 
मो. 9860477869