Breaking News

दखल - शहा यांची मातोश्रीवारी!

भारतीय जनता पक्षाला पोटनिवडणुकीत जबरदस्त धक्का बसला. पोटनिवडणुकांचे निकाल हे सार्वत्रिक निवडणुकीचे निदर्शक नसल्याचं सांगितलं जात असलं, तरी 1978 व 1989 या दोन वर्षांतील पोटनिवडणुकांचे निकाल हे त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांची नांदी होती, हे सिद्ध झालं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्ष राहिलं असताना 14 जागांपैकी अवघ्या एका जागेवर भाजपला यश मिळालं, हे लक्षण चांगलं नाही. भाजपविरोधात सर्वंच पक्ष एकत्र येत असताना किमान मित्रपक्ष तरी दुरावणार नाहीत, याची क ाळजी आता भाजपला लागली आहे. तेलुगु देसमनं स्वतंत्र चूल मांडली आहे.
..................................................................................................................................................
बिजू जनता दल त्याच मार्गावर आहे. अकाली दल व शिवसेनेनं तसे संकेत दिले आहेत. शिवसेना दररोज भाजपवर तुटून पडते आहे. विरोधकोंपक्षाही शिवसेनेची टीका जास्त जहरी आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मातोश्रीवरची भेट महत्त्वाची आहे. हेच शहा पूर्वी मातोश्रीवर जायला कमीपणा मानीत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांचे मातोश्रीशी कायम चांगले संबंध राहिले आहेत. शिवसेनेपेक्षा भाजप मोठा भाऊ झाल्यानं त्याचा अहंगड बळावला. त्यामुळं शिवसेनेनं कितीही इशारे दिले, तरी त्याची दखल घ्यायची नाही, असंं भाजपनं ठरविलं होतं; परंतु आता भाजपला उपरती झालेली असावी. शिवसेनेनं पालघरच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. पालघरच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असला, तरी सर्वंच ठिकाणी असं होईल, याची खात्री नाही.
कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या निवडणुकीचं उदाहरण देऊन शिवसेनासोबत नसली तरी आपण जिंकू शकतो, असं म्हटलं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेलं यश तसंच आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीनं झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेना सोबत असो किंवा नसो;आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना त्यांनी या वेळी पदाधिकार्‍यांना दिल्या. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र सबुरीची भूमिाका घेत युती एका बाजूनं होत नाही, ती दोन्ही बाजूनं व्हायला हवी असं मत मांडलं. युती झाली नाही, तर राज्याची सत्ता जाण्याची भीती महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी व्यक्त केली होती. पालघरच्या निवडणुकीनं भाजपची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे, असा दावा करताना तरीही शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा व्यक्त करताना शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला तर ठीक नाही तर निवडणुकांच्या तयारीला लागलोय, असं सांगत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला. पालघरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपाला आाव्हान देत आपली ताकद आजमावून पाहिली. या निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळवता आलं असलं, तरी विजय मिळवता आला नाही. भाजपचाच विजय झाल्यानं नेत्यांचा आत्मविश्‍वास दुणावल्याचं लक्षात येतं.
पालघरच्या निवडणुकीतील निकालानंतरही शिवसेनेनं भाजपच्या यशावर टीका केली होती. निवडणूक यंत्रणेला मॅनेज करून विजय मिळविल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपचा आजही पंचनामा करण्यात आला आहे. या परिस्थितीत भाजपचे अध्ययक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. शाह मातोश्रीवर जाऊन संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची भेट घेणार आहेत. शाह पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. फडणवीस या बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरू होती; मात्र तसं झालं नाही. कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुक ीतील पराभवानंतर भाजप बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून शाह हे ठाकरेंसोबत युती कायम ठेवण्याबद्दल चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातं.
दुसरीकडं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र शिवसेना काही झालं तरी एकला चलो रे ही भूमिका सोडणार नसल्याचं सांगत आहेत. पालघर पोटनिवडणुकीमुळं भाजप युती करण्याचा विचार करत असेल, तर हे फारच दुर्देवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 2019 निवडणुक ीत पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र आले असल्यानं भाजपची काही प्रमाणात कोंडी झाली आहे. त्यात मित्रपक्षांनी साथ सोडू नये, यासाठी आता मोदी आणि शाह यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मोदी यांच्या आदेशानंतरच शाह मुंबईत येऊन ठाकरेंशी युती कायम राखण्यासंबंधी चर्चा करणार असल्याचं समजतं. शाह यांनी युतीसाठी हात पुढं केला, तर ठाकरे आपली भूमिका कायम ठेवणार की नमती भूमिका घेणार हे उद्याच स्पष्ट होईल. शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर शाह यांना मातोश्रीवर यावसं वाटतं, या राऊत यांच्या प्रति क्रियेतूनही भाजपच युतीसाठी हतबल झाला आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केंद्रामध्ये सत्तेत येऊन 4 वर्ष झाली, तोपर्यंत शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटलं नाही; पण आता भाजपचे सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून चाललेत, देशातील राजकारण बदलतंय, भाजपविरोधात जनतेमध्ये राग वाढतोय. त्यातच पालघरमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून दाखवली. आमचा निसटता पराभव झाला असेल; पण आमची मतं पाहून अनेकांना धडकी भरली आहे. जिथं निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथं लाख लाख मतं मिळाली . पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दाखवल्यानं अनेकांना धडकी भरली आहे आणि त्यामुळेच आता चार वर्षांनी शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतंय, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ठाकरे यांनी भविष्यात भाजपशी युती करणार नाही, असा निर्धार केला होता. शिवसेनेने हा निर्णय अंमलात आणल्यास भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाहा मातोश्रीवर जात आहेत. त्यांंच्या बैठकीत पूर्वीचा सारा मान, अपमान गिऴून दोन्ही पक्षात युती होते, की नाही, हे समजेल.