Breaking News

पावसाळा आला तरी रेल्वे भुयारी मार्गाचे काम अदयापी अपूर्णच

सोलापूर, दि. 02, जून - रेल्वे प्रशासनाने रामहिंगणी येथे रस्ता बंद करून सुरू केलेल्या भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे एका बाजूला रेल्वेमार्ग आणि दुसर्‍या बाजूला असलेल्या नदीमुळे या गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क पावसाळ्यात तुटण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारामुळे हे काम संथगतीने होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न झाल्याने दुर्घटना घडल्यास त्याला रेल्वे प्रशासन व ठेकेदारांना जबाबदार धरण्याची मागणी ग्रामपंचयात सदस्य भाऊसाहेब वाघमोडे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

डिसेंबर 2017 मध्ये रामहिंगणी येथील गेट क्र. 49 येथे 427/7/8 किलोमीटरवरील रस्ता भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद करण्यात आला. मात्र तेथे पर्यायी रस्ता बांधला नाही. त्यामुळे रेल्वेमार्ग ओलांडून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असल्याने तेथील खड्ड्यात पाणी साचले आहे. जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागत आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याइतपत भुयारी मार्गाचे काम केले. पुढील काम संथगतीने सुरू आहे. याचा रामहिंगणी ग्रामस्थांना त्रास होत आहे. पावसाळ्यापूर्वी भुयारी न झाल्यास या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटू शकतो.