राज्यसभेतील नवनियुक्त 55 खासदार कोट्यधीश
भाजपचे 15 खासदार कोट्यधीश
नवी दिल्ली, दि. 01 - राज्यसभेतील नवनियुक्त 57 खासदारांपैकी 55 म्हणजेच 96 टक्के खासदार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या खासदारांमध्ये 252 कोटींपेक्षाही जास्त संपत्ती असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. तर काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्याजवळ 212.53 कोटी व बसपाचे सतीश चंद्र मिश्रा यांच्याजवळ 193 कोटींची मालमत्ता आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) ने जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार संसद सदस्यांमध्ये सर्वाधिक संपत्तीमध्ये वाढ झालेल्यांमध्ये भाजपचे अनिल दवे असून, त्यांची संपत्ती 2.75 लाखांहून 60.95 लाख झाली आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीमध्ये 8.41 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1.51 कोटींवरून 14.22 कोटी झाली आहे.
राज्यसभेवर 57 सदस्यांची नव्याने निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे 17, काँग्रेसचे 9, समाजवादी पक्षाचे 7, अण्णाद्रमुकचे 4 तर बिजू जनता दलाचे तीन सदस्य निवडून गेले आहेत. यासह संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाजवादी पक्ष व तेलगू देसम पक्षाचे प्रत्येकी दोन खासदार आहेत. अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना तथा वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य निवडून गेले आहेत. सध्याच्या राज्यसभा सदस्यांमध्ये एका अपक्ष उमेदवाराचाही समावेश आहे.