Breaking News

सचिच दर्जाच्या अधिकार्‍याची बदली होऊनही पदभाराचे कोडे सुटेना

औरंगाबाद : निवडणूकांना सामोरे जाण्यास केवळ दीड वर्षांचा कालावधी असतांना देखील मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रात मात्र सचिव दर्जाच्या अधिकार्‍यास बदली होऊनही कार्यभार न मिळाल्यामुळे चक्क घरी बसायची वेळ शासनाने आणली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हरिभाऊ आनंदराव ढंगारे यांची जल व भुमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे महासंचालक पदावर 14 मार्च रोजी बदली झाली परंतू नवीन नियुक्तीच्या जागी अद्यापीही ढंगारे यांना रुजू करून न घेतल्यामुळे जलसंपदा आणि जलसंधारण या दोन विभागातल्या समन्वयाचा अभाव आणि शासनाचं निद्रिस्त धोरण चव्हाट्यावर आलं आहे.
14 मार्च रोजी ढंगारे यांची महासंचालक, वाल्मी या पदावर बदली झाली. त्यानंतर लगेचच गोदावरी मराठवाडा मधील ढंगारे यांचा कार्यभार मुख्य अभियंता अजय को हिरनकर यांनी एकतर्फी घेतला. परंतु गोदावरी मराठवाडा मधून कार्यमुक्त झालेल्या ढंगारे यांच्याकडे मात्र महासंचालक वाल्मी या पदाचा कार्यभार सोपवला गेला नाही. कारण महासंचालक वाल्मी हे पद मृद व जलसंधारण या विभागाच्या आस्थापनेवरील आहे. त्या पदावर ढंगारे यांची बदली करताना जलसंपदाने जलसंधारणाची मान्यता घेतलेली नसल्यामुळे जलसंपदाकडून आलेल्या ढंगारे यांच्याकडे कार्यभार सोपवला गेला नाही. पर्यायाने कार्यकारी संचालक असलेले ढंगारे घरी बसत आहेत आणि मुख्य अभियंता असलेले कोहिरकर मात्र कार्यकारी संचालक नसताना दुहेरी पदभार सांभाळत आहेत. शासनाच्या दोन विभागातल्या या वादामुळे अनेक प्रश्‍न अधोरेखित झाले आहे. गोदावरी मराठवाडा विक ास महामंडळामध्ये अवघ्या एक वर्षापूर्वी आलेल्या ढंगारे यांची एकाच वर्षात बदली झाली कशी? जलसंपदातून जलसंधारणमध्ये बदली करताना जलसंपदाने जलसंधारणाची मान्यता का घेतली नाही? जर वाल्मीचा कारभार ढंगारे यांच्याकडे सोपवायचा नसेल तर वाल्मी वगळता तापी खोरे, कोकण खोरे, गोदावरी मराठवाडा या ठिकाणच्या कार्यकारी संचालक पदाच्या जागा रिक्त आहेत, त्यापैकी एखाद्या ठिकाणी ढंगारे यांची नियुक्ती का केली जात नाही? कुठलाही अपराध नसताना सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना गेल्या दीड महिन्यापासून ढंगारे यांना घरी का बसवून ठेवलं जातं आहे? ढंगारेंच्या या बदली प्रकरणात पारदर्शी कारभाराचा जप करणारे मुख्यमंत्री लक्ष घालतील का?