Breaking News

मुंबई साबां अभियंता पदावर डेब्रीज संशयीतांची वर्णी?

पारदर्शक कारभाराचे पिंड घालून तीळ वाहण्याची नतद्रष्ट खेळी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षेला आव्हान
मुंबई/विशेष प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस सरकारच्या पारदर्शक कारभार धोरणावर तीळ वाहणार्‍या मंत्रालय डेब्रीज घोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी नवी खेळी खेळली जात असून तिजोरीच्या चाव्या दरोडेखोरांच्या हातात देण्यासारखा नतद्रष्टपणा मुंबई साबांत सुरू झाल्याचे समजते. गेले वर्षभर सरकारच्या कारभाराचे बाभाडे काढण्यास कारणीभूत ठरलेले मंत्रालय डेब्रीज प्रकरणाची चौकशी लांबवून विस्मरणात नेण्यासाठी नवनवीन क्लूप्त्या योजल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून मुंबई साबां मंडळाची सुत्रे डेब्रीज घोटाळ्याची चौकशी मॅनेज करू शक णार्‍या अभियंत्यांकडे देण्याचे घाटत आहे.सरकारच्या दृष्टीने दुर्दैवी वृत्त म्हणजे मुंबई साबां अधिक्षक अभियंता पदावर डेब्रीज घोटाळ्याशी संबंधित तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांना पदस्थापीत करण्याचा डाव आखला गेल्याचे समजते. या खेळीत साबां शुक्राचार्य यशस्वी झाले तर स्वपक्षियांकडून नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात पारदर्शकतेचे कपडे फाडून घेण्याची नामुष्की सरकार ओढवून घेईल, अशी चर्चा साबांत सुरू आहे
मंत्रालय परिसरात विविध कामांच्या नावावर बोगस बीले काढण्याचे प्रकार आ. चरणभाऊ वाघमारे आणि अन्य चाळीस आमदारांच्या दक्षतेने उघड झाले.
मंत्रालय इमारतीतून नऊशे ट्रक डेब्रीज काढणे, सहाव्या मजल्यावरील केबीन क्रमांक 618 मध्ये नुतनीकरणावर 46 लाखांचा निधी खर्च झाल्याचे दाखवणे, मंत्रालयात एकाच दिवशी आठशे तीस मजूर आणणे या सार्‍या बाबी अतिशोयोक्तीची मर्यादा ओलांडणार्‍या ठरल्या मागील तीनही अधिवेशनात आ. चरणभाऊ वाघमारे आणि अन्य सहयोगी आमदारांनी या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडले होते. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून चौकशी करण्याचे आदेश काढले होते. मुख्यमंंत्र्यांच्या क ार्यालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीची सातत्याने विचारणा होऊ लागल्याने प्रधान सचिवांकडून चौकशी अहवाल सादर करण्याचा रेटा लावला गेला.
15 मे रोजी चौकशी अधिकारी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले होते.अद्याप चौकशी अहवालाचे घोंगडे साबांतील शुक्राचार्यांनी भिजत घातले असून रणजीत हांडे यांना वाचविण्यासाठी कालहरण सुरू आहे.
रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी मोजमाप पुस्तिकेत केलेल्या नोंदींच्या अनुषंगाने अहवाल सादर व्हावा, अशी साबां प्रशासनातील शुक्राचार्यांची इच्छा आहे. तथापी ही इच्छा पुर्ण करण्यास विद्यमान चौकशी अधिकारी आणि अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी सपशेल नकार दिल्याने मंडळींची गोची झाली आहे, यावर उपाय म्हणून अरविंद सुर्यवंशी यांची अधिक्षक अभियंता पदावरून उचलबांगडी करीत तेथे आपल्या मर्जीतील अभियंता बसविण्याचा मार्ग काढला आहे. यात सुरूवातीला नाना पवार आणि अधिक्षक अभियंता पदावर बढतीच्या प्रतिक्षेत असलेले कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्या नावाची चर्चा होती.
तथापी ही दोन्ही नावे आता मागे पडली असून मुंबई साबां अधिक्षक अभियंता म्हणून नाशिकचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांना आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. मंत्रालय डेब्रीज घोटाळा प्रकरणात मुख्य सुत्रधार म्हणून रणजीत हांडे यांची चौकशी प्रलंबीत आहे, हे वास्तव लाथाडून मुंबई साबां अधिक्षक अभियंता म्हणून त्यांच्याकडे चौकशीचा प्रभार सोपवणे आणि त्यांच्यावर संशय असलेल्या घोटाळ्याची चौकशी करणे म्हणजे सरकारच्या पारदर्शक धोरणाचे पिंड घालून त्यावर तीळ वाहण्यासारखे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षेला हे उघड आव्हान मानले जात असून साबांती शुक्राचार्यांची ही खेळी यशस्वी झाली तर येत्या पावसाळी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना स्वपक्षिय आमदारांच्या तोफेखान्याला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत.