Breaking News

25 हजारांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकाला अटक

नवी मुंबई, दि. 16, डिसेंबर - 25 हजारांची लाच घेतांना कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कैलास मुंबईकर याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात अटक केली. अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी कैलास मुंबईकर याने मयत व्यक्तीच्या मुलाकडे त्याने 50 हजारांची मागणी करून 25 हजाराची रक्कम घेतांना ही कारवाई करण्यात आली.


जुलै महिन्यात कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत दिलीप खराटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधिताविरोधात नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी त्यांचा मुलगा दीपक यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कागदपत्रे मागितली होती. अर्ज करूनही त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली नव्हती. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून उपनिरीक्षक कैलास मुंबईकर यांची भेट घेतली. 

यावेळी मुंबईकर याने खराटे यांच्याकडे अपघाताच्या कागदपत्रांसाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती तडजोड करून 25 हजार रुपयांमध्ये कागदपत्रे देण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. याप्रकरणी खराटे यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सापळा रचून मुंबईकर याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.