Breaking News

अतिक्रमण हटविताना प्रशासनाचा पक्षपातीपणा

शहरातील अतिक्रमण हटविताना प्रशासनाचा पक्षपातीपणा होत असल्याची भावना टपरीधारकांमध्ये आहे. भेदभाव होत आहे, तेंव्हा कच्च्या आणि पक्क्या तसेच लहान मोठ्या व्यापार्‍यांना सरसकट एकच मापामध्ये अतिक्रमण काढावे, भेदभाव करू नये, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा टपरिधारकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनावर नगरसेवक शामीर सय्यद, शिवसेना शहरप्रमुख संजय काशीद, प्रा. मधुकर राळेभात, शिवाजी राळेभात, नामदेव म्हेत्रे, जग्गू राळेभात, संजय अंदूरे, माजी सरपंच सुनिल कोठारी, संतोष गुंदेचा, नयुम शेख, दीपक चव्हाण, वाहेद शेख, चांद तांबोळी, कामील सय्यद नीतीन मैड यांच्यासह शेकडो टपरिधारकांच्या सह्या आहेत.
गेल्या दोन दिवसापासून वाहतुक कोंडीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम, तहसील प्रशासन, पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेण्यास रिक्षा फीरवून सांगितले. अधिकार्‍यांनीही पोलिस फौजफाट्यासह येवून 3-4 वाजेपर्यंत आपले अतिक्रमणं काढून घ्या, अन्यथा 5 वाजता जेसीबी मशीन लावून अतिक्रमणे हटविण्यात येतील असे प्रत्यक्ष दुकानात जावून तोंडी सांगितले. त्यामुळे घाबरून जात छोट्या व्यावसायिकांनी आपापले अतिक्रमित दुकाने स्वतःहून काढून घेतले. मात्र पक्की बांधकाम असणार्‍या मोठ्या व्यापार्‍यांनी आपले अतिक्रमण काढले नाहीत, अधिकार्‍यांनीही त्या व्यापार्‍यांना अतिक्रमण काढण्यास सांगितले नाही. मात्र पुन्हा सायंकाळी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांनी उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी शहरात फीरून सांगितले.
दुसर्‍या दिवशी सकाळी टपरीधारकांवर सरसकट अतिक्रमण निघत नसून, केवळ लहान टपरीधारकांवरच अन्याय होत असल्याने, त्यांनी याबाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना पक्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, कोणते, किती अंतरावरील अतिक्रमणे काढण्याची रुपरेषा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविल्याप्रमाणे रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला पन्नास फुटांपर्यंत अतिक्रमणे काढण्यात येतील. यामध्ये भेदभाव होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र टपरीधारकांनी तहसीलदार यांना सांगितले की, बीड रोड कार्नर पासून खर्डा चौकातील इमामशावली दर्गापर्यंतचे सर्व मोठ्या व्यापार्‍यांची पक्की बांधकामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार अतिक्रमित आहेत तरी, त्यांना हटविले जात नाही, लहान लहान टपरीधारकांनाच फक्त हटविले जात आहे. 
हा भेदभाव थांबविण्याची विनंती करत अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला. तहसीलदारांनी टपरीधारक व अधिकार्‍यांसमवेत लवकरच बैठक घेवून पुढील निर्णय ठरविण्यात येईल असे सांगितले.