Breaking News

एस.टी.च्या आगमनाने शिरापुर, चोंभुत परिसरात आनंद

अनेक वर्षापासून शिरापुर, चोंभुत या परिसरातील ग्रामस्थांनी गावामध्ये एस.टी. पाहिलीच नव्हती. अनेक वेळा एस.टी. महामंडळाकडे सरपंच, विविध संघटना यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. मात्र एस.टी. महामंडळाकडून प्रत्येक वेळा आश्‍वासन व कारणे देवून टाळाटाळ होत असे. पंचक्रोशीतील सरपंच, विविध तरुण मंडळे, संघटना, जि.प. माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर उचाळे यांनीं या भागात एस.टी. बस सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. दोन दिवसांपासून या भागात एस.टी. सुरु झाल्याने शिरापुर, चोंभुत पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे. एस.टी. सुरु झाल्याबद्दल माजी सभापती राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर उचाळे यांनी एस.टी. महामंडळाचे आभार व्यक्त केले. 
पारनेर तालुक्यात शिरापुर, चोंभुत या भागामध्ये अनेक वर्षांपासून ग्रामस्थ एस.टी.ची प्रतिक्षा करत होते. शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी इतर वाहनांचा आधार घेतल्याशिवाय अळकुटी गावास जाणे शक्य नव्हते. अनेक वर्षांपासून या भागातील वृध्द व्यक्तींनी एस.टी.चा प्रवास केला नव्हता. 
रेनवडी, म्हस्केवाडी या भागामध्ये पुणे जिल्ह्यातून रात्रीच्या मुक्कामी एस.टी. येत असत, मात्र सकाळी 6 वा. एस.टी. बस निघुन गेल्यावर या भागात पुन्हा एस.टी. येत नसे. रेनवडी ग्रामस्थांनी ही एस.टी. बस रेनवडी पर्यंत यावी अशी मागणी केली. सुरु झालेली एस.टी. पारनेर, अळकुटी, शिरापुर, चोंभुत, म्हस्केवाडी, अळकुटी असा प्रवास करत आहे. सुरु झालेल्या एस.टी.चा श्रीफळ फोडून नारळाच्या झावळ्या लावून शिरापुर, चोंभुत, म्हस्केवाडी ग्रामस्थांनी पुजन केले. कर्मचार्‍यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. एस.टी. महामंडळाचे सर्वांनी आभार मानले.