Breaking News

महापुरूषांना जातीत अडकवू नका

महापुरुषांच्या व महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना, त्याच समाजाचे, जातीचे लोक पुढे येतांना दिसत आहेत. महापुरूषांना जातीत अडकवू नका, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण व जयंती उत्सवाच्या बाबतीत तसे होऊ नये. गोपीनाथ मुंडे यांंना एका समाजापुरते व एका पक्षापुरते बांधुन ठेवू नका, राजकारणाचा वारसा, रक्ताच्या नात्याचा वारसा कोणालाही मिळो, मी मात्र मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा आयुष्यभर चालविल, गोरगरीबांचे, कष्टकर्‍यांचे प्रश्‍न सोडविल असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. जामखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त अयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. धनंजय मुंडे बोलत होते.
यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, दत्तात्रय वारे, प्रा. संजय वराट, डॉ. ज्ञानेश्‍वर झेंडे, नगरसेवक अमित चिंतामणी, दिगांबर चव्हाण, अमित जाधव, शरद शिंदे, विकास राळेभात, महादेव डूचे, विष्णू गंभीरे, लहू डोंगरे उपस्थित होते. विशेष म्हणजे नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे राज्यात 1995 ला सत्तांतर झाले. यावेळीही झालेल्या परिवर्तनाचे तेच ’जनक’ आहेत. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, ऊस तोडणी कामगारांसाठी लढा लढला. केंद्रात सरकार आले, साहेब केंद्रीय मंत्री झाले. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटतील. कष्टकर्‍यांचा आवाज बुलंद होईल, असे वाटत असतांनाच नियतीने घात केला, आणि साहेब आपल्यातून निघून गेले. मोठे दुःख झाले. मात्र मला व्यक्त होता येत नव्हते. माझा काहीही दोष नसताना, रक्ताचा असूनही मला खलनायक ठरवलं. चार वर्षानंतर का होईना मला जामखेडच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणने बोलवले, माझं साहेबांशी रक्ताचे नाते आहे हे मान्य केले. आपण येथे आलो म्हणून काहीच्या पोटात दुखले असेल, मात्र वीस वर्ष साहेबांबरोबर आपण सावली सारखे राहिलो. संघर्षाचा काळ होता. तेंव्हा इतर कोणी सोबत नव्हते. माझे आणि साहेबांचे केवळ चुलत्या-पुतण्याचे नाते नव्हते, तर मला त्यांच्या तर त्यांना माझ्या भावना ऐकमेकांच्या नजरेतून कळत होत्या. याचा विसर कोणाला तरी पडला आहे. मुंडे साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण त्यांचे आज स्मरण करण्यासाठी एकत्र आलोत. मला मात्र त्यांचे दररोज स्मरण होते, त्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. यावेळी पुण्यतिथी निमित्ताने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन झाले. तसेच रक्तदान शिबीरात 155 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी कलाकार निलेश दिवटे यांनी तर, प्रास्ताविक काशीनाथ ओमासे केले. तसेच आभार प्रकाश नागरगोजे यांनी मानले.